यावल तालुक्यात सरपंचाकडून हवेत गोळीबार; गावठी पिस्तूलप्रकरणी दोघांवर गुन्हा
डांभुर्णीच्या मुख्य चौकातील धक्कादायक प्रकार; पिस्तूल भुसावळ येथून खरेदी केल्याची पोलिसांसमोर कबुली
यावल | प्रतिनिधी : हर्षल पाटील
यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील लोकनियुक्त सरपंचाने डांभुर्णी गावातील मुख्य चौकात गावठी पिस्तूलमधून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास जगन्नाथ सोळुंके (रा. कोळन्हावी, ता. यावल) असे हवेत गोळीबार केल्याचा आरोप असलेल्या सरपंचाचे नाव आहे. त्यांनी डांभुर्णी येथील मुख्य चौकात गावठी पिस्तूलमधून हवेत फायरिंग केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.
पोलिसांच्या चौकशीत सोळुंके यांनी सदर गावठी पिस्तूल भुसावळ येथील रोशन भीमराव सपकाळे याच्याकडून सुमारे तीन महिन्यांपूर्वी खरेदी केल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बेकायदेशीर शस्त्र खरेदी-विक्रीच्या या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल हितेश बागुल यांच्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगणे तसेच गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सदर गावठी पिस्तूल नेमके कोठून आणण्यात आले, त्याची विक्री करणाऱ्या व्यक्तीचा यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच गोळीबार करण्यामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, याप्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.
