मैत्रीय बुद्ध विहारात वर्षावास प्रवचन मालिकेचे सातवे पुष्प संपन्न
‘अनित्य, अनात्म व दुःख’ विषयावर आयु.नी. प्रियांका अहिरे यांचे मार्गदर्शन; उपासिकांची उत्स्फूर्त उपस्थिती
भुसावळ प्रतिनिधी :
नालंदा नगर, भुसावळ येथील मैत्रीय बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व यांच्या वतीने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे सातवे पुष्प उत्साहपूर्ण आणि धम्ममय वातावरणात संपन्न झाले.
या प्रवचन मालिकेतील सातव्या कार्यक्रमात आयु.नी. प्रियांका ताई अहिरे (जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व) यांनी ‘अनित्य, अनात्म व दुःख’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी अत्यंत सोप्या, सहज आणि सर्वांना समजेल अशा भाषेत भगवान बुद्धांच्या धम्मातील या मूलभूत तत्त्वांचे विवेचन केले.
मानवी जीवनातील परिवर्तनशीलता, ‘मी’पणाची संकल्पना आणि दुःखाचे स्वरूप याबाबत त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून उपस्थितांना धम्मविचार समजावून सांगितले. बुद्धांच्या शिकवणुकीनुसार जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास आद.नि. सुजाताताई जंजाळे, आद.नि. वर्षाताई जाधव, आद.नि. घायतडक ताई (शहर संघटक), आद. अनुसयाताई डी. अहिरे, आद. सुमनताई पवार, आद. सीमाताई बावस्कर तसेच आद.नि. माधुरी ताई भालेराव (शहर कार्यकारिणी) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी परिसरातील श्रद्धाशील व धम्मविचारांशी बांधिलकी असलेल्या बौद्ध उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रवचनाचा लाभ घेतला. उपस्थितांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वर्षावासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या प्रवचन मालिकेतून धम्मविचारांचा प्रसार आणि समाजामध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कार्यक्रम भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.
