गाढोदे येथे वर्षावास प्रवचन मालिकेचे सातवे पुष्प संपन्न
‘अनित्य, अनात्म आणि दुःख’ विषयावर आयु. बाबूराव वाघ यांचे प्रबोधन; उपासक-उपासिकांची मोठी उपस्थिती
जळगाव प्रतिनिधी :
भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व अंतर्गत जळगाव तालुक्याच्या वतीने आयोजित राष्ट्रीय वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे सातवे पुष्प गाढोदे, ता. जळगाव येथे धम्ममय वातावरणात संपन्न झाले.
यावेळी आयु. बाबूराव वाघ (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक, जळगाव) यांनी ‘अनित्य, अनात्म आणि दुःख’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. भगवान बुद्धांच्या धम्मातील या महत्त्वपूर्ण संकल्पना त्यांनी अत्यंत सोप्या व सहज भाषेत स्पष्ट केल्या. तसेच दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या उदाहरणांचा आधार घेत विषयाचे विवेचन केल्याने उपस्थितांना धम्मविचार सहजपणे समजून घेता आले.
याप्रसंगी आयु. राजेश इंगळे (तालुका अध्यक्ष, जळगाव), आद. किरण सोनवणे (तालुका संस्कार सचिव), आद. जयपाल धुरंधर (तालुका पर्यटन सचिव), आद. गौतम सपकाळे (बौद्धाचार्य), आद. आधारअण्णा सपकाळे (माजी श्रामणेर), आद. समिंदर सपकाळे (माजी श्रामणेर), आद. संतोष सपकाळे (माजी श्रामणेर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच गाढोदे महिला ग्राम शाखेच्या अध्यक्षा आद. कविताताई सपकाळे व त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीसह परिसरातील श्रद्धाशील बौद्ध उपासक-उपासिका तसेच बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. गौतम सपकाळे यांनी केले, तर आयु. नी. कविताताई सपकाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
वर्षावासाच्या निमित्ताने आयोजित या धम्म प्रवचन मालिकेतून भगवान बुद्धांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा आणि धम्मविचारांची जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गाढोदे येथील कार्यक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झाले होते.
