महात्मा फुले हायस्कूलमध्ये ‘स्वच्छ शाळा–सुंदर शाळा’ अभियान
स्वच्छ परिसरामुळे आरोग्य आणि पर्यावरणाचे संवर्धन होते : मुख्याध्यापक जे. एस. पवार
धरणगाव प्रतिनिधी :
शासनाच्या निर्देशानुसार धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी महात्मा फुले हायस्कूलमध्ये शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता ‘स्वच्छ शाळा–सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत ‘एक दिवस स्वच्छतेसाठी’ स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानात शाळेची इमारत, वर्गखोल्या तसेच संपूर्ण शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली. मुख्याध्यापक जे. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या वेळी परिसरातील वृक्षांना विद्यार्थ्यांच्या हस्ते पाणी देण्यात आले. तसेच झाडांना खत देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक जे. एस. पवार म्हणाले, “परिसर स्वच्छ असेल तर मनुष्य निरोगी राहतो. स्वच्छ शाळा–सुंदर शाळा हा उपक्रम केवळ शाळेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सवय आपल्या दैनंदिन जीवनातही अंगीकारावी.”
या उपक्रमात ज्येष्ठ शिक्षिका एम. के. कापडणे, पी. डी. पाटील, एच. डी. माळी, व्ही. पी. वऱ्हाडे, ग्रंथपाल गोपाल महाजन, एस. एन. कोळी, व्ही. टी. माळी, जीवन भोई यांच्यासह शिक्षक-शिक्षिका, आजी-माजी विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. पाटील यांनी केले, तर आभार एच. डी. माळी यांनी मानले.
