दूध संस्थांनी पारदर्शक व सेवाभावी पद्धतीने काम करावे!
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या; आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांचे आवाहन
पारोळा : प्रतिनिधी (संदीप पाटील)
“दूध उत्पादक शेतकरी हा संपूर्ण दुग्ध व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या हितासाठी प्राथमिक दूध संस्थांपासून ते दूध संघापर्यंतची संपूर्ण व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि सेवाभावी पद्धतीने कार्यरत होणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी केले.
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव यांच्या वतीने पारोळा शहरातील पंकज बँक्वेट हॉल येथे पारोळा, अमळनेर व भडगाव तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांच्या चेअरमन व संचालकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
जिल्ह्यातील प्राथमिक दूध उत्पादक संस्थांच्या माध्यमातून दूध संकलन व्यवस्था अधिक सक्षम करणे, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणे, दूध संकलनात वाढ करणे तसेच जळगाव जिल्हा दूध संघाशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करून प्रभावी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

शेतकरी आणि दूध संघामधील महत्त्वाची कडी
मार्गदर्शन करताना आमदार ॲड. अमोलदादा पाटील म्हणाले की, प्राथमिक दूध संस्था ही दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघ यांच्यातील महत्त्वाची कडी आहे. ही कडी अधिक मजबूत झाली, तर त्याचा थेट फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होईल.
“प्रत्येक दूध संस्थेच्या चेअरमन व संचालक मंडळाने संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता, शिस्त आणि कार्यक्षमता यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दूध संकलन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न झाले पाहिजेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला दुग्ध व्यवसायाचा आधार
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात दुग्ध व्यवसायाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून आमदार पाटील म्हणाले की, अनेक शेतकरी शेतीसोबतच दूध व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे दूध उत्पादकांना योग्य दर, वेळेवर पेमेंट, आवश्यक सुविधा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.
दूध संकलनाची गुणवत्ता वाढविणे, संस्थांचे कामकाज गतिमान करणे, दूध उत्पादकांची संख्या व दूध संकलन वाढविणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेतकरी हितासाठी सातत्याने प्रयत्नांचे आश्वासन
“दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना अधिकाधिक सुविधा व उत्तम सेवा देण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. प्राथमिक दूध संस्था आणि दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक सक्षम, पारदर्शक आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी भविष्यातही सातत्याने प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी यावेळी दिले.
या कार्यशाळेत पारोळा, अमळनेर व भडगाव तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांचे चेअरमन, संचालक तसेच संबंधित पदाधिकारी सहभागी झाले होते.