धुळ्यात राजवाडे संशोधन मंडळाकडून शरद पवारांचा कृतज्ञता सोहळा!
शतकपूर्तीच्या निमित्ताने दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचे हस्तांतरण; पालकमंत्री जयकुमार रावल यांची १० कोटींच्या निधीची घोषणा
धुळे : प्रतिनिधी
धुळ्यातील इतिहासकार वि. का. राजवाडे संशोधन मंडळाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने मंडळाच्या उभारणीसाठी मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवार यांनी राजवाडे संशोधन मंडळाच्या ऐतिहासिक वारशाचे आणि गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधन कार्याचे कौतुक केले. यावेळी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक व औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
राजवाडे संशोधन मंडळाला शतकपूर्ती होत असल्याने मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कृतज्ञता सोहळ्यात शरद पवार यांचा जंगी सत्कार करण्यात आला. त्यांच्या उपस्थितीत मंडळाकडे जतन असलेल्या अनेक दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचे हस्तांतरणही करण्यात आले. या वस्तूंमुळे महाराष्ट्राच्या इतिहासाचा मौल्यवान ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या मंडळाच्या कार्याला अधिक बळ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राजवाडे मंडळाच्या कार्याचे पवारांकडून कौतुक
कार्यक्रमात शरद पवार यांनी राजवाडे संशोधन मंडळाने अनेक दशकांपासून जपलेल्या ऐतिहासिक वास्तू, वस्तू आणि दस्तऐवजांच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे कौतुक केले. इतिहास, संशोधन आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी अशा संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या सोहळ्यात महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांसह शास्त्रज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावत मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. मान्यवरांनी राजवाडे संशोधन मंडळाशी संबंधित जुन्या आठवणींना उजाळा देत ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या कार्याचे कौतुक केले.
राजवाडे संशोधन मंडळाला १० कोटींचा निधी
या कार्यक्रमात धुळ्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी राजवाडे संशोधन मंडळासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे मंडळाच्या आगामी उपक्रमांना मोठे आर्थिक पाठबळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
शतकपूर्तीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा कृतज्ञता सोहळा राजवाडे संशोधन मंडळाच्या ऐतिहासिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. इतिहासाचा ठेवा जतन करण्याबरोबरच नव्या पिढीपर्यंत तो पोहोचविण्याच्या मंडळाच्या कार्याला या सोहळ्यामुळे नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
राजकीय, वैज्ञानिक व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
या प्रसंगी खासदार शरद पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अनुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, माजी मंत्री तथा माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, कार्यक्रमाचे आयोजक संजय मुंदडा, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
