रावेर शहरात उघडयावर मांस विक्री करणाऱ्यां दुकान मालकावर केली कारवाई..
सावदा रोडवरील ‘सुपर मटन सेंटर’वर छापा; अस्वच्छ वातावरणात मांस विक्री केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
रावेर : प्रतिनिधी (अक्षय वाघ)
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात पोलिसांनी गस्त वाढविली असताना उघड्यावर तसेच अस्वच्छ वातावरणात मांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. रविवारी, दि. ३० ऑगस्ट रोजी सावदा रोडवरील ‘सुपर मटन सेंटर’ येथे उघड्यावर मांस विक्री होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी दुकान मालकांसह दोघांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे, गोपनीय शाखा व गुन्हे शोध पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना सुपर मटन सेंटर येथे लोकांना सहज दिसेल अशा पद्धतीने बोकडाचे मांस विक्री होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी दुकानाची पाहणी केली असता दुकानात तीन बोकडांचे मांसाचे सांगाडे लटकविलेल्या अवस्थेत असल्याचे तसेच परिसरात कत्तल केलेल्या बोकडांचे रक्त पडलेले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांच्या प्रेस नोटनुसार, मांसावर मोठ्या प्रमाणात माश्या बसलेल्या होत्या तसेच रक्त व मांसाच्या तुकड्यांमधून दुर्गंधी येत होती. या अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी गोपनीय शाखेचे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल हिरालाल गुमळकर यांच्या फिर्यादीवरून शेख इरफान शेख खलिल आणि शेख फिरोज शेख खलिल (रा. मदीना कॉलनी, रावेर) यांच्याविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०७/२०२६ असून भारतीय न्याय संहितेच्या कलम २७१ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १०५ व ११७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार
उघड्यावर व अस्वच्छ पद्धतीने मांस विक्री करणाऱ्यांना यापूर्वीही वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास संबंधितांवर यापुढेही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर तसेच रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान ठाकूर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील व विशाल पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हमीद तडवी करीत आहेत.
