ग.स. बँकेच्या निवडणुकीत लोकमान्य पॅनलचा दणदणीत विजय!
२१ पैकी २१ जागांवर वर्चस्व; निशांत रंधे पुन्हा एकदा ‘किंगमेकर’, विरोधकांचा सुपडा साफ
धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग.स. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकमान्य पॅनलने दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवत लोकमान्य पॅनलने खऱ्या अर्थाने ‘लोकमान्यता’ मिळवल्याचे चित्र निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे.
या संपूर्ण निवडणुकीत प्रभावी जनसंपर्क आणि नियोजनबद्ध प्रचाराच्या माध्यमातून पॅनलच्या विजयासाठी परिश्रम घेणारे गटनेते निशांत रंधे हे पुन्हा एकदा ‘किंगमेकर’ ठरल्याची चर्चा बँकिंग वर्तुळात सुरू झाली आहे.
“येणाऱ्या काळात सभासदांच्या हिताला प्राधान्य देत बँकेचा कारभार अधिक सक्षम आणि यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जातील,” अशी प्रतिक्रिया लोकमान्य पॅनलचे गटनेते निशांत रंधे यांनी दिली.

२१ पैकी २१ जागांवर लोकमान्यांचा झेंडा
ग.स. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण २१ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी लोकमान्य पॅनलच्या पाच जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित १६ जागांसाठी मतदान घेण्यात आले.
या १६ जागांसाठी झालेल्या मतदानातही मतदारांनी पुन्हा एकदा लोकमान्य पॅनलवर विश्वास व्यक्त केला. १६ पैकी १६ जागांवर लोकमान्य पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला. बिनविरोध पाच जागांसह पॅनलने सर्व २१ जागांवर विजय मिळवला.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच लोकमान्यांचा बोलबाला
शहरातील अग्रवाल विश्राम भवन येथे आज दुपारी मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच लोकमान्य पॅनलच्या उमेदवारांची आघाडी दिसून येत होती. प्रत्येक फेरीत लोकमान्य पॅनलच्या उमेदवारांचा विजयाचा कल कायम राहिला.
अखेर १६ जागांचा निकाल जाहीर झाल्यानंतर १६ पैकी १६ जागांवर लोकमान्य पॅनल विजयी झाल्याचे स्पष्ट झाले. या निकालामुळे विरोधकांना मोठा राजकीय धक्का बसला असून, लोकमान्य पॅनलचे बँकेवरील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
फटाक्यांची आतषबाजी; गुलालाची उधळण
निकाल जाहीर होताच लोकमान्य पॅनलच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. विजयी उमेदवार व पदाधिकाऱ्यांचे समर्थकांकडून अभिनंदन करण्यात आले.
या विजयानंतर बँकेच्या आगामी कारभाराबाबत सभासदांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. निवडणुकीतील विजयाचे रूपांतर बँकेच्या प्रगतीत करण्याचे आव्हान आता लोकमान्य पॅनलसमोर असणार आहे.
यावेळी लोकमान्य पॅनलचे गटनेते निशांत रंधे, पॅनल प्रमुख भैय्या शिंदे, चंद्रकांत सत्तेसा, गणेश सत्तेसा, संजय पवार, योगेश धात्रक, दीपक अहिरे, दीपक निकम, संजय पारधी यांच्यासह पॅनलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
