ग्रामसभेला पुरेसा पोलिस बंदोबस्त द्या; अन्यथा ग्रामसभा रद्द करा
धुळ्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा मोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
धुळे : ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, अन्यथा ग्रामसभा रद्द करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने धुळ्यात मोर्चा काढण्यात आला.
कल्याण भवन येथून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन साद केले. हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
17 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे ग्रामसभा सुरू असताना ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांना मानसिक व शारीरिक त्रास झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. या घटनेनंतर धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये तीव्र संतापासह भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावे आणि त्यांच्या जीविताचे संरक्षण व्हावे, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. भविष्यात ग्रामसभा आयोजित करताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा; बंदोबस्त उपलब्ध न झाल्यास ग्रामसभा घेण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चात युनियनचे अध्यक्ष प्रफुल्ल शिंदे, चेतन पाटील, आबा पवार, आर. ए. पाटील, एच. एन. अहिरे, विजय सैंदाणे, रोहिणी देसले, गीता बैरागी, सारिका परदेशी, पूनम शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
