स्त्री रुग्णालयाचे दिमाखात उद्घाटन; मात्र सुविधा अपुऱ्या?
हिरे रुग्णालयात नातेवाईकांनाच ओढावे लागते स्ट्रेचर; शिवसेना उबाठाचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
धुळे : जिल्हा रुग्णालयातील स्त्री रुग्णालयाचे नुकतेच थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. मात्र, उद्घाटनानंतरही गर्भवती महिलांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वॉर्ड बॉय उपलब्ध नसल्याने गर्भवती महिलांच्या नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढून न्यावे लागत असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे.
प्रसूतीसाठी स्त्री रुग्णालयात आलेल्या काही महिलांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने हिरे मेडिकल रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आल्याचा दावा शिवसेनेने केला. मात्र, हिरे रुग्णालयात पोहोचल्यानंतरही वॉर्ड बॉय उपलब्ध नसल्याने गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढून नेण्याची वेळ आल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
रुग्णालयांचे उद्घाटन दिमाखात केले जाते; मात्र प्रत्यक्षात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मूलभूत सुविधांसाठीही त्रास सहन करावा लागत असेल, तर अशा उद्घाटनाचा उपयोग काय? असा संतप्त सवाल शिवसेना उबाठा गटाने उपस्थित केला आहे.
रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांबाबत तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, तसेच रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन साद केले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आरोग्य सेवक सुरज भावसार, संदीप चौधरी, पंकज भारस्कर, सागर निकम, अजय चौधरी, गोकुळ बडगुजर, सागर साळवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
