शब्द, विचार अन् संस्कृतीचा उत्सव; छत्रपती संभाजीनगरात जिल्हा मराठी साहित्य संमेलन
२८ व २९ नोव्हेंबरला दोन दिवसीय साहित्यिक सोहळा; ग्रंथदिंडी, कवी संमेलन, परिसंवादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून आयोजित करण्यात येणारे हे दोन दिवसीय संमेलन २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी संपन्न होणार आहे.
संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार असून, त्यानंतर स्मरणिका व पुस्तक प्रकाशन, कथाकथन, कवी संमेलन, नाटक, एकांकिका, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच परिसंवाद अशा विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून साहित्य, कला आणि संस्कृतीचा सुरेख आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे.
परिसंवादासाठी ‘बाल साहित्य : आज आणि उद्या’ हा महत्त्वपूर्ण विषय निवडण्यात आला आहे. बालसाहित्याचे बदलते स्वरूप, त्यासमोरील आव्हाने तसेच भविष्यातील वाटचाल यावर या परिसंवादातून विचारमंथन होणार आहे.
यासोबतच एका ख्यातनाम व्यक्तीची विशेष मुलाखत आयोजित करण्यात येणार असून, साहित्य व कलाक्षेत्रातील मान्यवरांसह काही नामवंत सिने कलावंतांनाही संमेलनासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे साहित्यप्रेमी आणि रसिकांसाठी हे संमेलन वैचारिक मेजवानीसोबतच कला आणि संस्कृतीचा अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
या जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संघर्ष सावळे आहेत. लेखक, कवी, साहित्यिक, कलाकार, विद्यार्थी तसेच साहित्यप्रेमी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या साहित्य सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
