नशिराबाद नगरपरिषदेत अजब कारभार! शिस्तीचा पाठ देणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांकडेच ‘आयडी कार्ड’ गायब
मनसेचे निवेदन स्वीकारताना अधिकाऱ्यांचाच नियमबाह्य कारभार; सर्वसामान्य नागरिकांना कोणता संदेश देताय? नागरिकांचा संतप्त सवाल
नशिराबाद (प्रतिनिधी):
नशिराबाद नगरपरिषदेचा कारभार शिस्तीऐवजी मनमानी पद्धतीने चालल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने स्थानिक नागरिकांच्या विविध प्रलंबित व जिव्हाळ्याच्या प्रश्नांचे निवेदन नशिराबाद नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र, आश्चर्य म्हणजे, हे निवेदन स्वीकारत असताना खुद्द मुख्य अधिकाऱ्यांच्याच छातीवर किंवा गळ्यात कोणतेही अधिकृत ओळखपत्र (आयडी कार्ड) लावलेलंच नव्हते.
शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता असावी, कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी कोण आहे हे स्पष्ट व्हावे, यासाठी प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने व अधिकाऱ्याने आपले अधिकृत ओळखपत्र सक्तीने बाळगणे आणि ते दृश्यमान ठेवणे बंधनकारक असते. शासन स्तरावरून याविषयी वारंवार कठोर निर्देश दिले जातात. मात्र, जनतेच्या पैशांवर वेतन घेणारे आणि प्रशासकीय शिस्त राखण्याची मुख्य जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, तेच मुख्याधिकारी या नियमाला हरताळ फासत असल्याचे या प्रसंगी उघड झाले.
एकीकडे सामान्य नागरिकांवर नियमांचा बडगा उगारला जातो आणि साध्या कामांसाठीही चकरा मारायला लावल्या जातात, तर दुसरीकडे खुद्द नगरपरिषदेचे प्रमुखच नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. ज्या अधिकाऱ्याला स्वतःच्या अंगावर अधिकृत ओळखपत्र लावण्याचे भान नाही, ते अधिकारी शहरातील विकास आणि शिस्त काय राखणार? असा संतप्त सवाल आता नशिराबादमधील सुजाण नागरिकांमधून व मनसे कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे अधिकारी वर्गातील बेजबाबदार वृत्ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
