भावी इंजिनिअर्सच्या नव्या प्रवासाचा शुभारंभ
व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा उत्साहात
मलकापूर प्रतिनिधी : स्थानिक लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या नवप्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘इंडक्शन प्रोग्राम’ आणि ‘पालक सभा’ उत्साही, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे मार्गदर्शक प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, संस्थेचे सचिव डॉ. अरविंदजी कोलते, कोषाध्यक्ष सुधीरभाऊ पाचपांडे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डीन डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी को-ऑर्डिनेटर प्रा. आर. एम. चौधरी आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. मोहम्मद जावेद यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख प्रा. एन. ए. खर्चे, प्रा. एस. एल. फरपट, प्रा. वाय. पी. सुशिर आणि प्रा. एस. एम. भोळे मंचावर उपस्थित होते. विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, नवप्रविष्ट विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘दामिनी पथका’च्या उपस्थितीत महिला सुरक्षेबाबत जनजागृती
विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षेबाबत जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाला ‘दामिनी पथका’च्या अधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्रा. संगीता खर्चे यांच्या हस्ते दामिनी पथकातील सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. एस. डी. लवंगे यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे स्वागत करून दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा मांडली.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविण्यावर भर
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डीन डॉ. युगेश खर्चे यांनी ‘३६०° स्टुडंट : नीड ऑफ द अवर’ या विषयावर मार्गदर्शन केले. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासोबतच तांत्रिक कौशल्ये आणि व्यवहारज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर प्रा. आर. एम. चौधरी यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक प्रवासासाठी प्रोत्साहित केले. संस्थेचे सचिव डॉ. अरविंदजी कोलते यांनी ‘समाज, राष्ट्र, संस्कृती आणि नवसंशोधन’ या विषयावर मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रविकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिस्त, सातत्यपूर्ण मेहनत आणि ध्येयपूर्तीसाठी मार्गदर्शन केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
आचल गोळे यांच्या नियोजनाखाली महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. पहिल्या सत्राच्या समारोपावेळी प्रा. राधिका एस. बिहाडे यांनी आभार मानले.
यानंतर उपस्थित पाहुणे, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी स्नेह-अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
पालकांशी शाखानिहाय संवाद
अल्पोपहारानंतर विशेष पालक सभेचे आयोजन करण्यात आले. पालकांनी शाखानिहाय निश्चित केलेल्या दालनांमध्ये जाऊन संबंधित विभागप्रमुखांशी थेट संवाद साधला. यावेळी महाविद्यालयाची शैक्षणिक पद्धती, उपस्थितीचे नियम, परीक्षा पद्धती तसेच उपलब्ध सोयी-सुविधांची पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये प्रा. सचिन बोरले, प्रा. बुद्धप्रिय गोपनारायण, प्रा. पूनम पठ्ठे, प्रा. दीप्ती लढे, प्रा. योगेश पाटील, प्रा. भाग्यश्री नारखेडे, प्रा. अंकुश नारखेडे, प्रा. नितीन भारांबे, प्रा. शारदा लांडे तसेच अनंता बराटे, सचिन कोलते, प्रतीक हांडगे, तुषार पाटील, अंकित वाघोदे आणि राहिल खान आदींनी मोलाचे योगदान दिले.
