केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नशिराबाद येथे उत्साहात संपन्न
ज्ञानाची देवाण-घेवाण, गुणवत्तापूर्ण शिक्षणावर मार्गदर्शन; शिक्षकांचा कृतीयुक्त सहभाग
प्रतिनिधी | नशिराबाद
नशिराबाद : जि.प. केंद्र शाळा नशिराबाद येथे सोमवार, दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी गटशिक्षणाधिकारी मा. श्री. अजित तडवी, शिक्षणविस्तार अधिकारी मा. श्री. विजय पवार व मा. श्री. जितेंद्र चिंचोले यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात पार पडली.
शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा खारे यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. विजय पवार व केंद्रप्रमुख मा. श्री. राहुल संसारे यांच्या हस्ते सरस्वती माता आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी ‘हंसवाहिनी सरस्वतीच्या’ या ईशस्तवनाचे सादरीकरण केले. तसेच ‘स्वागतम् सुस्वागतम्, हा मानाचा मुजरा’ या गीतावर विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणावर मार्गदर्शन
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मा. श्री. विजय पवार यांनी ज्ञानाची देवाण-घेवाण, अनुभवांची सांगड आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या वाटचालीला अधिक बळकटी देण्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले.
केंद्रप्रमुख मा. श्री. राहुल संसारे यांनी ‘मागील महिन्याचा आढावा’ तसेच ‘शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि समुदाय सहभाग’ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
विविध विषयांवर अभ्यासपूर्ण सादरीकरण
परिषदेत ‘विचारांची देवाण-घेवाण’ या विषयावर श्रीमती जयश्री कांबळे, कु. मीना गुळवे व श्री. विनोद नाईक यांनी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. ‘पाठाचे नियोजन व मासिक नियोजन’ या विषयावर श्रीमती मंजू बारी व श्री. लोटन पवार यांनी शिक्षकांचा कृतीयुक्त सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.
‘PGI अहवाल 2025-26’ मधील विविध मुद्द्यांचे विश्लेषण श्रीमती कविता पाटील व श्रीमती वंदना बागुल यांनी केले. तसेच ‘डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’ या विषयावर कु. सुचिता वासनिक व श्रीमती जयश्री पगारे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
‘एकात्मतेचे प्रतीक’ ठरली रांगोळी
केंद्रप्रमुख राहुल संसारे यांच्या संकल्पनेतून केंद्रातील सर्व शाळांना रांगोळीच्या माध्यमातून एकत्रित दर्शविण्यात आले. ‘एकात्मतेचे प्रतीक’ म्हणून साकारलेली ही रांगोळी परिषदेत विशेष आकर्षण ठरली.
परिषदेचे सुंदर फलक लेखन श्री. निलेश सपकाळे यांनी केले, तर शिक्षण परिषदेची आकर्षक व्हिडिओ निर्मिती श्री. विजय निकम यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शोभा सावकारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अविनाश पाटील यांनी मानले. अध्यक्षांच्या परवानगीने ‘वंदे मातरम्’ या गीताने शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.
शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा खारे, सौ. शोभा डोळे, सौ. नीता कापडणे, श्रीमती कविता पाटील, श्री. विनोद जयकर व श्री. जितेंद्र चौधरी यांच्यासह शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले.
