भीमा-कोरेगाव, परभणी आंदोलनातील गुन्हे तातडीने रद्द करा!
विधानभवनात ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन; डॉ. दीपक केदार यांची विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे मागणी
मुंबई : भीमा-कोरेगाव आणि परभणी येथील घटनांनंतर झालेल्या आंदोलनांमध्ये आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने रद्द करावेत, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दीपक केदार यांनी आज महाराष्ट्र विधानभवन, मुंबई येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची भेट घेऊन निवेदन साद केले.
दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घेण्यात आलेल्या धर्तीवर भीमा-कोरेगाव व परभणी आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्ह्यांचाही तातडीने पुनर्विचार करून ते रद्द करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी राज्यातील वाढते दलित अन्याय-अत्याचार, सामाजिक न्यायाचे प्रश्न, आरक्षणाचे संरक्षण आणि विविध सामाजिक प्रश्नांसाठी झालेल्या आंदोलनांवरील गुन्हे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आंदोलकांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे अनेकांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शासनाने या प्रकरणांकडे संवेदनशीलतेने पाहावे, अशी भूमिका ऑल इंडिया पँथर सेनेने मांडली.
या मागणीची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिल्याचे संघटनेने सांगितले.
या भेटीवेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे मुंबई कार्याध्यक्ष ॲड. कृष्णा दिवेकर उपस्थित होते.
“आंदोलकांवरील गुन्हे रद्द करून सामाजिक न्यायाच्या लढ्याला न्याय द्यावा,” अशी ठाम भूमिका ऑल इंडिया पँथर सेनेने व्यक्त केली आहे.
#ऑलइंडियापँथरसेना #भीमाकोरेगाव #परभणी #जयभीम #जयसंविधान
