खानदेशातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते धनाजी रामचंद्र बिऱ्हाडे..
मुंबई इलाख्यातून निवडून आलेले महार समाजातील पहिले सरपंच
भुसावळ संघरत्न सपकाळे..✍️
खानदेशातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा दलित भारत या प्राक्षिकाचे संपादक धनाजी रामचंद्र बिऱ्हाडे बिऱ्हाडे गुरुजी यांचा जन्म असोदा तालुका जिल्हा जळगाव येथे झाला. सातवीपर्यंतचे शिक्षण आसोदा येथे झाले व अध्यापनाचा कोर्स पीडीसी हायस्कूल धुळे येथून केला.
त्यांचे प्राथमिक शिक्षक म्हणून जळगाव जिल्ह्यातील रांजणगाव पिंपळगाव भुसावळ नशिराबाद यावल इत्यादी ठिकाणी नोकरी केली अस्पृश्यतेचे चटके सहन न झाल्यामुळे यावल येथे असताना नोकरीचा राजीनामा दिला व सामाजिक कार्यास सुरुवात केली.
सामाजिक जीवनात धनाजी बिऱ्हाडे यांनी विविध पदे भूषवली आहेत सदस्य जळगाव नगरपालिका सदस्य पूर्व खानदेश डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड आणि विशेष म्हणजे सरपंच असोदा तालुका जळगाव मुंबई इलाख्यातून निवडून आलेले महार समाजातील पहिले सरपंच… सदस्य संत चोखामेळा बोर्डिंग जळगाव अध्यक्ष पूर्व खानदेश जिल्हा प्राथमिक शाळा कामठी संघ.
1937 पूर्व खानदेश विभाग 1951 जळगाव मतदार संघ पराभूत दोन वेळेस विधानसभा निवडणुकीत त्यांनी सहभाग घेतला जळगाव खान्देश मधील सामाजिक कार्यातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. खानदेशातील आंबेडकरी चळवळ सतत जागृत ठेवण्याचे काम बिऱ्हाडे यांनी केल्याचे दिसून येते अनेक तरुणांना कामासाठी प्रशिक्षकांच्या नोकऱ्या लावून दिल्या जळगाव भुसावळ जामनेर सावदा इत्यादी ठिकाणी अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात मुलांना शिकण्याची गोडी लागण्यासाठी डिस्ट्रिक लोकल बोर्ड मार्फत विविध प्रोत्साहन पर योजना राबविण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा बोर्डाच्या शाळांना दरवर्षी सुट्टी देण्याच्या निर्णयात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. सरपंच पदी असताना अस्पृश्यता कमी करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेऊन सरकारने असोदा ग्रामपंचायत दीड हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन आदर्श गाव म्हणून शासनातर्फे गौरव करण्यात आला.
असोदा गावामध्ये सफाई कामगारांना वेतनावर नेमणुका करण्यास सुरुवात केली समता सैनिक दलाच्या सभा अस्पृश्य कामगार संघटना व दलित फेडरेशनच्या बैठकांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच गायरान जमिनीवर अस्पृश्यांना घरे बांधायची परवानगी मिळाली त्यांची सरपंच पदाची दैदीप्यमान कारकीर्द आजही तेथील लोकांच्या स्मरणात आहे.
आंबेडकरी चळवळीचे हे लोन महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात येऊन पोहोचले त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन खानदेशातील हजारो कार्यकर्ते त्यात सहभागी झाले जळगाव जिल्ह्यातील या चळवळीची धुरा बिऱ्हाडे गुरुजी व कर्मवीर सेनू नारायण मेढे यांनी अत्यंत यशस्वीपणे सांभाळली हिंदी इंग्रजी व संस्कृत भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते अस्पृश्यता निवारणासाठी दलित समाजाला सर्वप्रथम शिक्षणाची महती कळणे आवश्यक असल्याने धनाजी बिऱ्हाडे गुरुजी गावोगावी जाऊन लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे.
यांना त्या निमित्ताने खानदेशातील समाजप्रबोधनाचा डंका चौफेर दुमदुमत होता त्याची दखल घेऊन बाबासाहेबांनी आसोदा गावाला भेट दिली बिऱ्हाडे गुरुजी यांच्या घरी मुक्काम केला भेटीत देविदास बुवा या महंतांकडून कबीराचे दोहे ऐकले तसेच धनाजी बिऱ्हाडे यांचे अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य अगदी जवळून पाहिले ते पाहून बाबासाहेबांना खूप आनंद झाला.
बाबासाहेबांच्या निरोपाच्या वेळी वाड्यातील मढी समोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेतील भाषणात बाबासाहेबांनी अस्पृश्यता निवारणाबाबत अतिशय प्रेरणादायी भाषण केले त्यांच्या भाषणात ने उपस्थितांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आणि त्याचा परिणाम होऊन खानदेशातील सामाजिक चळवळ अधिक गतिमान झाली.
