पारोळ्यात ‘आमदार दहीहंडी’चा थरार; सात थरांच्या मनोऱ्याने मैदान दणाणले
आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य आयोजन; रावेरच्या महात्मा फुले मित्र मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक, ₹१ लाख ५१ हजारांचे पारितोषिक
पारोळा प्रतिनिधी (संदीप पाटील) : आमदार मा. ॲड. अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून पारोळा शहरातील एन.ई.एस. हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेला भव्य ‘आमदार दहीहंडी सोहळा’ उत्साह, जल्लोष आणि थरारात संपन्न झाला. एरंडोल विधानसभा मतदारसंघात प्रथमच अशा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मैदानावर मोठी गर्दी केली.
मुंबई आणि पुणे यांसारख्या महानगरांमध्ये पाहायला मिळणाऱ्या भव्य दहीहंडी सोहळ्याचा थरार ग्रामीण भागातील नागरिकांनाही अनुभवता यावा, या उद्देशाने आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भव्य विद्युत रोषणाई, आकर्षक साउंड सिस्टीम आणि गोविंदा पथकांच्या थरारक सादरीकरणामुळे संपूर्ण मैदान जल्लोषाने दुमदुमून गेले.

दहीहंडी सोहळ्यात विविध गोविंदा पथकांनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडवत मानवी मनोरे उभारले. विशेष म्हणजे, तब्बल सात थरांचा मानवी मनोरा उभारत गोविंदा पथकांनी दहीहंडीला सलामी दिली. सात थरांचा हा थरार पाहण्यासाठी उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत गोविंदांचा उत्साह वाढविला.
या अटीतटीच्या स्पर्धेत महात्मा फुले मित्र मंडळ, रावेर या संघाने दमदार कामगिरी करत सात थरांचा मनोरा उभारला आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. विजेत्या संघाला ₹१ लाख ५१ हजारांचे पारितोषिक देण्यात आले.
श्रीकृष्ण बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांनी द्वितीय क्रमांक पटकावत ₹३१ हजारांचे पारितोषिक, तर गोपालपुरा मित्र मंडळ, जळगाव यांनी तृतीय क्रमांक मिळवत ₹११ हजारांचे पारितोषिक पटकावले. सात थरांचा मानवी मनोरा उभारणाऱ्या सर्व गोविंदा पथकांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
पारोळा शहरासह एरंडोल, भडगाव तसेच संपूर्ण एरंडोल विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते. गोविंदा पथकांचा थरार, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आकर्षक रोषणाई यामुळे कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.
एकंदरीत, आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या ‘आमदार दहीहंडी सोहळ्याने’ पारोळ्याच्या सांस्कृतिक आणि उत्सवी परंपरेत नवा अध्याय जोडला. सात थरांचा थरार आणि हजारो नागरिकांचा जल्लोष यामुळे हा सोहळा नागरिकांच्या स्मरणात राहणारा ठरला.
