तामसवाडीत शिक्षक दिनाची ५४ वर्षांची अनोखी परंपरा कायम
माजी सरपंच हिरामण पवार यांचा उपक्रम अखंड सुरू; शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान
पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची अनोखी परंपरा पारोळा तालुक्यातील तामसवाडी गावाने गेल्या ५४ वर्षांपासून अखंड जपली आहे. गावाचे माजी सरपंच हिरामण पवार यांनी सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त गावातील विविध शाळांमधील शिक्षकांचा सन्मान केला जातो.
यंदाही ५ सप्टेंबर रोजी माध्यमिक विद्यालय, तामसवाडी येथे शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा परिषद कन्या शाळा, जिल्हा परिषद मुलांची शाळा तसेच वस्ती शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
‘शिक्षकांचा सन्मान करणे हे गावाचे कर्तव्य’
यावेळी मनोगत व्यक्त करताना हिरामण पवार म्हणाले, “शिक्षक वर्षभर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून नवीन पिढी घडवतात. त्यामुळे गावाचा नागरिक म्हणून त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे.”
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुख्याध्यापक ए. के. चव्हाण, उपमुख्याध्यापक डी. आर. पाटील, पर्यवेक्षक एम. वाय. लिंगायत, मुख्याध्यापिका डॉ. अश्विनी भदाणे, निलेश शिंदे आदी उपस्थित होते.
विद्यार्थिनी अंजली जगदेव व समृद्धी राकेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
५४ वर्षांची परंपरा कौतुकास्पद
मुख्याध्यापक ए. के. चव्हाण यांनी ५४ वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू ठेवल्याबद्दल हिरामण पवार यांचे आभार मानले. तसेच गावाने शिक्षकांवर ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन सर्व शिक्षकांच्या वतीने दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. डी. पाटील यांनी केले, तर आभार एस. एस. बोरसे यांनी मानले.
विशेष : ५४ वर्षांपासून शिक्षकांचा सन्मान करण्याची ही परंपरा तामसवाडीच्या सामाजिक आणि शैक्षणिक संस्कृतीतील एक आदर्श उपक्रम ठरत आहे.
