कोपरगाव | शिवमराजे मगर-देशमुख : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती आणि टंचाईमुळे त्रस्त असलेल्या हॉटेल व्यावसायिक, केटरर्स आणि लघुउद्योजकांसाठी कोपरगावमधून एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मवीर शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी उद्योग समूहाने ‘इथेनॉल स्टोव्ह प्रणाली’ विकसित केली असून, ही प्रणाली स्वस्त, पर्यावरणपूरक आणि प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे.
ही प्रणाली पारंपारिक एलपीजी गॅसप्रमाणेच कार्य करते, मात्र इंधन म्हणून द्रवरूप इथेनॉलचा वापर केला जातो. यामध्ये गॅस सिलिंडरऐवजी सुरक्षित टाकीचा वापर केला जातो. टाकीतून इथेनॉल बर्नरपर्यंत पोहोचून वाफेत रूपांतरित होते आणि ऑक्सिजनसोबत मिसळून निळ्या ज्वालेत जळते. त्यामुळे स्वयंपाक वेगाने आणि सुरक्षितरीत्या करता येतो.
या स्टोव्हमुळे इंधन खर्चात मोठी बचत होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार, व्यावसायिक गॅसच्या तुलनेत सुमारे ३० ते ४० टक्के खर्च कमी होऊ शकतो. तसेच इथेनॉलचा दर स्थिर राहण्याची शक्यता असल्याने व्यवसायिकांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे. साखर कारखान्यांमध्येच इथेनॉल निर्मिती होत असल्याने पुरवठा साखळीही अधिक स्थिर राहणार आहे.
व्यावसायिक बर्नरची किंमत साधारण १०,००० ते १५,००० रुपये, तर घरगुती स्टोव्हची किंमत ५,००० ते ७,५०० रुपयांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारकडून अनुदान मिळाल्यास या किमती आणखी कमी होऊ शकतात.
सध्या हे स्टोव्ह खुल्या बाजारात उपलब्ध नसून, इच्छुकांनी कोल्हे साखर कारखान्याशी संपर्क साधून मागणी नोंदवावी लागते. नगर आणि नाशिक जिल्ह्यातील काही हॉटेल व्यावसायिकांना प्रायोगिक तत्त्वावर स्टोव्ह देण्यात आले असून, त्यांच्या अभिप्रायानंतर मोठ्या प्रमाणावर वितरण सुरू होणार आहे.
या प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे इथेनॉल वितरण केंद्रांची उभारणी. कोपरगाव परिसरात अशी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन असून, इंधन सहज उपलब्ध होईल. व्यावसायिकांनी नोंदणी करताना परवाना, गॅस वापराची माहिती आणि साठवणुकीची सुरक्षितता याची पूर्तता करावी लागणार आहे.
इथेनॉल हे हरित इंधन असल्याने प्रदूषण कमी होते. तसेच एलपीजीच्या तुलनेत गळती किंवा स्फोटाचा धोका कमी असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हा पर्याय फायदेशीर ठरतो. भारतीय मानक ब्युरोने (BIS) ठरवलेल्या निकषांनुसारच हे स्टोव्ह विकसित करण्यात आले आहेत. शेतकरी ते ग्राहक या साखळीला बळ देणारा हा उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठीही फायदेशीर ठरणार आहे. ऊसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा इंधन म्हणून वापर झाल्यास शेतकऱ्यांनाही थेट लाभ मिळणार आहे.
एकूणच, इंधन टंचाई आणि महागाईच्या संकटात ‘इथेनॉल स्टोव्ह’ ही संकल्पना व्यावसायिकांसाठी नवी ‘संजीवनी’ ठरत असून, केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
