‘आनंदराज आंबेडकरांचा अवमान सहन करणार नाही’; रिपब्लिकन सेनेचा इशारा
रमेश कदम यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी; महाराष्ट्रभर आंदोलन उभारण्याचा इशारा
मालेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्याबाबत रमेश कदम यांनी केल्याचा आरोप असलेल्या कथित अवमानकारक वक्तव्यावरून आंबेडकरी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या वक्तव्याचा निषेध करत रिपब्लिकन सेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, संबंधित व्यक्तींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आनंदराज आंबेडकर तसेच आंबेडकर कुटुंबीयांविषयी अशा प्रकारची वक्तव्ये करणे हा आंबेडकरी समाजाच्या भावनांचा अवमान असल्याचे रिपब्लिकन सेनेने निवेदनात म्हटले आहे. संबंधित वक्तव्यामागील नेमका हेतू काय होता, याची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणीही करण्यात आली.

“आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत. प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत तातडीने योग्य ती कारवाई करावी,” अशी भूमिका रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

दरम्यान, प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष बिपीन पटाईत, युवा जिल्हाध्यक्ष अॅड. आकाश सुरवाडे, महिला शहराध्यक्ष सौ. सारिका गायकवाड, तालुकाध्यक्ष रविंद्र ढोडरे, सम्राट निकम, मुकेश खैरनार, युवराज वाघ, किरण केदारे, सिद्धांत शिंदे, विनोद पवार, रवि यशोद, वाल्मिक त्रिभुवन, राजू वाघ, कल्पेश लोखंडे, राजेंद्र अहिरे, अक्षय अहिरे, नितीन बि-हाडे, आकाश महिरे, अॅड. स्वप्निल गायकवाड आदी उपस्थित होते.




