भडगावच्या देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात
विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी — उपप्राचार्य डॉ. संजय भैसे; एनएसएसच्या माध्यमातून नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव विकसित करण्यावर भर
भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय भैसे होते.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. भैसे यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच समाजसेवेत सक्रिय सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी, तसेच समाजातील विविध प्रश्नांविषयी संवेदनशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
एनएसएसच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. भालेराव यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास, भूमिका, ब्रीदवाक्य, एनएसएस बॅजचे महत्त्व तसेच राष्ट्रीय स्तरावरील विविध शिबिरांची माहिती दिली. नियमित व विशेष निवासी शिबिरांची कार्यपद्धती आणि स्वयंसेवकांची भूमिका याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव, स्वयंसेवेची भावना आणि राष्ट्रनिर्मितीची जाणीव विकसित होत असल्याचे डॉ. भालेराव यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांचे ‘माय भारत’ पोर्टलवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यात आले.
एचआयव्ही-एड्सबाबत जनजागृती
शासकीय ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथील समुपदेशक नामदेव पाटील यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही-एड्सविषयी मार्गदर्शन केले. एचआयव्ही-एड्सबाबत योग्य माहिती जाणून घेणे, समाजातील गैरसमज दूर करणे आणि जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ रूपाली पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान पोस्टर स्कॅन करून राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना एनएसएसच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. इंदिरा लोखंडे यांनी केले, तर आभार डॉ. एस. एन. हडोळतीकर यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
