अंतुर्लीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!
प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्तुत्य उपक्रम; ग्रामस्थांसह रुग्ण व नातेवाईकांचा उत्स्फूर्त सहभाग
शैलेश गुरव, जळगाव ग्रामीण (प्रतिनिधी)
अंतुर्ली : जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या रक्तदान शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी डॉ. पाटील यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना, “रक्तदान हे श्रेष्ठदान असून, आपल्या एका रक्तदानामुळे गरजू रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते,” असे आवाहन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक तसेच आशा स्वयंसेविकांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदात्यांचे मार्गदर्शन, नोंदणी तसेच शिबिरातील विविध व्यवस्थापनाची जबाबदारी आरोग्य पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.
विशेष म्हणजे, अंतुर्ली गावातील ग्रामस्थ मंडळ, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी कोणत्याही अतिरिक्त आवाहनाची प्रतीक्षा न करता स्वयंप्रेरणेने रक्तदानासाठी पुढाकार घेतला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेले काही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनीही सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवत रक्तदानात सहभाग नोंदविला. त्यामुळे संपूर्ण शिबिरस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकाच्या वतीने आभार मानण्यात आले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला. या उपक्रमामुळे रक्तदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली असून, गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करून देण्याबरोबरच ‘रक्तदानातून सामाजिक बांधिलकी’ हा संदेशही देण्यात आला.
अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
