बोदवड–जामनेर–धुळे मार्गावर ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू
नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण; विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी व नोकरदारांसह प्रवाशांना थेट वाहतुकीची सुविधा
बोदवड प्रतिनिधी : संदिप महाजन
बोदवड, दि. २७ : बोदवड तालुक्यातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली असून, मुक्ताईनगर आगाराची नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा बोदवड–जामनेर मार्गे धुळे या मार्गावर सुरू करण्यात आली आहे. आमदार चंद्रकांत (भाऊ) पाटील यांच्या पाठपुराव्यातून ही सेवा सुरू झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या बससेवेमुळे बोदवड, जामनेर तसेच परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, रुग्ण आणि सर्वसामान्य प्रवाशांना धुळे येथे जाण्यासाठी थेट वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मार्गातील बदलांची आवश्यकता कमी होऊन वेळ व प्रवासातील गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे. बोदवड आणि जामनेर ही दोन्ही ठिकाणे एसटीच्या अधिकृत स्थानकांच्या यादीत आहेत.
बससेवा सुरू झाल्यानंतर ‘राजमाता जिजाऊ’ बसचे चालक व वाहक यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पेढे वाटून बससेवेच्या प्रारंभाचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बोदवड नगरपंचायतीचे माजी गटनेते देवेंद्र खेवलकर, जनसेवक विनोद पाडर, नांदगावचे सरपंच प्रविण पाटील, खान्देश प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेशकुमार वर्मा, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बडगुजर, विवेक फाटे, अशोक जैन, रविंद्र चौधरी, सुकलाल गंगतीरे, तोसीफ पिंजारी यांच्यासह परिसरातील प्रवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन बससेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार चंद्रकांत (भाऊ) पाटील यांचे नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच बोदवड–जामनेर–धुळे या मार्गावरील नव्या बससेवेचा विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, शेतकरी आणि इतर प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
