अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात भादलीत एल्गार
“उपवर्गीकरण केल्यास राज्य सरकारला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल”; मुकुंद सपकाळे यांचा इशारा
जळगाव : अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या प्रस्तावित उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समितीच्या वतीने जळगाव ग्रामीण भागातील भादली येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी समितीचे प्रमुख संयोजक मुकुंद सपकाळे यांनी राज्य सरकारने अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करू नये, अशी भूमिका मांडत आंदोलनाचा इशारा दिला.
यावेळी बोलताना मुकुंद सपकाळे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेतील कलम ३४१ अंतर्गत अनुसूचित जातींची अधिसूचित यादी निश्चित करण्यात आली असून आरक्षण हा अनुसूचित जातींचा घटनात्मक अधिकार आहे. या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे. राज्य सरकारने उपवर्गीकरणाचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या कायदेशीर आणि घटनात्मक प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने २०२४ मध्ये State of Punjab v. Davinder Singh प्रकरणात अनुसूचित जातींच्या वर्गात उपवर्गीकरण काही घटनात्मक अटींच्या अधीन राहून करता येऊ शकते, असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी तर्कसंगत आधार आणि उपवर्गीकरणाच्या उद्देशाशी त्याचा संबंध असणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
४ ऑक्टोबरला जळगावात महामोर्चा
अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव येथील शिवतीर्थ मैदानापासून कोर्ट चौकापर्यंत भव्य जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
या महामोर्चात विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नेते सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप, खासदार चंद्रकांत हंडोरे आणि दलित पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
महामोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुकुंद सपकाळे यांनी केले. भादली येथील सभेला महिला, युवक तसेच परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
