रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या पदाधिकारी व समाजबांधवांची बैठक संपन्न
समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा; घरकुल, गटई कामगारांचे स्टॉल, कर्जसुविधा व संत रोहिदास महाराजांच्या पुतळ्याबाबत मागण्यांवर विचारमंथन
पुणे प्रतिनिधी : शंकर जोग
पुणे : रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने पुणे स्टेशन परिसरातील महासंघाच्या कार्यालयात पदाधिकारी व समाजबांधवांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. चर्मकार समाजाच्या विविध प्रश्नांवर तसेच संघटनात्मक विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
चर्मकार समाजातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे, गटई कामगारांना अधिकृत स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावेत, तसेच समाजातील बेरोजगार युवक-युवतींना संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या माध्यमातून कर्जसुविधा उपलब्ध करून द्यावी, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
याशिवाय संघटना अधिक सक्षम करण्यासाठी शहर व जिल्हास्तरावर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे, संत रोहिदास महाराजांचा पुतळा पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड शहरात उभारणे, तसेच समाजातील युवक-युवतींसाठी वधू-वर परिचय मेळावे आयोजित करणे, अशा विविध विषयांवर पदाधिकारी व समाजबांधवांनी आपली मते मांडली.
बैठकीस रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड उपस्थित होते. त्यांनी उपस्थित पदाधिकारी व समाजबांधवांना मार्गदर्शन करत संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
यावेळी महिला प्रदेश कार्याध्यक्ष सारिका कांबळे, राज्य कार्याध्यक्ष रमेश बडगे, खजिनदार सुनील राठी, पुणे जिल्हाध्यक्ष महेंद्र एरल्लू, महिला जिल्हाध्यक्षा उमा वाडेकर, पुणे शहर महिला अध्यक्षा शशिकला ढवळे, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष प्रभू उदपुरे, जिल्हा युवा अध्यक्ष मयूर पोटे, विजय वरछाये, हरिभाऊ हवणे, गटई कामगार जिल्हाध्यक्ष सुनील चराटे, रवींद्र शिराळे, छाया मराठे, कमलताई उनवणे, रोहिणी उदमले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.
दरम्यान, समाजाच्या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समाजाच्या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठवून शासनदरबारी पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
