नर्मदा नदीकाठच्या ५१ गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर!
नर्मदा जवळ असूनही महिलांच्या डोक्यावर हंडे; जलजीवन मिशनच्या प्रधान सचिवांकडे सुभाष पावरा यांचे निवेदन
धडगाव तालुका प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातून नर्मदा नदी वाहत असतानाही नदीकाठच्या अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागातील ५१ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप गंभीर असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होत असून, महिलांना व मुलींना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुभाष शंकर पावरा यांनी म्हटले आहे.
धडगाव दौऱ्यावर आलेल्या जलजीवन मिशनच्या राज्यस्तरीय प्रधान सचिवांची भेट घेऊन पावरा यांनी या प्रश्नासंदर्भात सविस्तर निवेदन साद केले. नर्मदा नदीसारखा मोठा जलस्रोत जवळ असूनही संबंधित गावांमध्ये प्रभावी पाणीपुरवठा व्यवस्था नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महिलांच्या डोक्यावरील हंडा कधी उतरणार?
पाणी भरण्यासाठी महिलांना व मुलींना डोक्यावर हंडे घेऊन दूरवर जावे लागत असल्याने त्यांचा मोठा वेळ आणि शारीरिक श्रम खर्ची पडत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या परिस्थितीचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असून मुलींच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
“महिलांच्या डोक्यावरचा हंडा कधी उतरणार?” असा सवाल उपस्थित करत पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. पाणीटंचाईचा प्रश्न हा केवळ पिण्याच्या पाण्यापुरता मर्यादित नसून महिलांच्या सन्मानाशी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित असल्याचे पावरा यांनी निवेदनात नमूद केले.
पशुधनाच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर
या भागातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहे. त्यामुळे नागरिकांसोबतच गुरेढोरे, शेळ्या आणि इतर पशुधनासाठी पाण्याची उपलब्धता हा देखील गंभीर प्रश्न बनल्याचे सांगण्यात आले.
दुर्गम भागातील नागरिकांना उपलब्ध असलेल्या असुरक्षित किंवा दूषित जलस्रोतांवर अवलंबून राहावे लागत असल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यताही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
५१ गावांचा निवेदनात समावेश
सुभाष पावरा यांनी सादर केलेल्या निवेदनात सवऱ्यादिगर, भामाणे, उडद्या, बाबरी, भादल, कुंड्या, झापी, माळ, खर्डी खुर्द, गेंदा, बिलगाव, निमखेडी, खुटवडा, शेलगदा, तिनसमाळ, डोमखेडी, चिचखेडी, डूठल, अट्टी, सेलदा, थुवाणी, पिंपळचौक, पौला, वाहवाणी, माकडकुंड, कात्री, कुकतार, कुंभरी, गोराडी, रोषमाळ खुर्द, सोन, भानोली, खडक्या, कुंडल, खांडबारा, उमराणी, धनाजे, आचापा, पिंपरी, नंदलवड, हरणखुरी, भुजगाव, शेलकुवी, भोगवाडे, राजबर्डी, तेलखेडी, त्रिशूल, कुवरखेत, बोरी, चिखली आणि खर्डी खुर्द या गावांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, परिसरातील ग्रामस्थ आणि शिष्टमंडळानेही पाणीटंचाईमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
“हा मूलभूत हक्काचा आणि महिलांच्या सन्मानाचा प्रश्न”
सामाजिक कार्यकर्ते सुभाष पावरा म्हणाले, “नर्मदा नदी आपल्या जिल्ह्यातून वाहत असतानाही नदीकाठच्या दुर्गम गावांतील माता-भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन दूरवर जावे लागते, ही गंभीर बाब आहे. पाण्याअभावी महिलांचा अमूल्य वेळ आणि श्रम वाया जात आहेत. जलजीवन मिशनच्या प्रधान सचिवांची भेट घेऊन आम्ही हा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. हा केवळ पाणीपुरवठ्याचा विषय नसून आदिवासी भागातील नागरिकांच्या मूलभूत हक्काचा आणि महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. शासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात; अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
आता वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदन साद झाल्यानंतर या ५१ गावांच्या पाणीप्रश्नावर प्रशासनाकडून कोणती ठोस उपाययोजना केली जाते आणि त्याची अंमलबजावणी कधी होते, याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
