३० वेळा रक्तदान करणाऱ्या आरोग्य निरीक्षकाचा आदर्श
राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त संजय सोनार कळवाडीकर यांचे जनजागृतीचे आवाहन; ‘रक्तदानामुळे अशक्तपणा येतो हा गैरसमज’
भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ
भडगाव : ‘रक्तदानासारखे दुसरे पुण्य नाही’ हे केवळ शब्दांत न सांगता आपल्या कृतीतून सिद्ध करणारे प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपरखेड येथील आरोग्य निरीक्षक संजय सोनार कळवाडीकर यांनी आजपर्यंत तब्बल ३० वेळा ऐच्छिक रक्तदान केले आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानातून रक्तदानाबाबत जनजागृती करण्याचा आदर्श निर्माण झाला आहे.
१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर संजय सोनार यांनी नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. रक्तदानाबाबत समाजात असलेल्या गैरसमजांवर मात करून तरुणांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
“माझ्या ३० व्या रक्तदानानंतरही मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो, हा गैरसमज आहे. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी रक्तदान अत्यंत महत्त्वाचे आहे. रक्त कृत्रिमरीत्या तयार करता येत नसल्याने गरजू रुग्णांसाठी माणसाने केलेले रक्तदानच जीवनदायी ठरते,” असे सोनार यांनी सांगितले.
अपघातग्रस्त रुग्ण, प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज भासणाऱ्या महिला, थॅलेसेमिया तसेच कर्करोगाच्या रुग्णांना अनेकदा रक्ताची आवश्यकता असते. त्यामुळे नियमित रक्तदानातून गरजू रुग्णांना मदत करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
शासकीय सेवेत असूनही ३० वेळा ऐच्छिक रक्तदान
शासकीय सेवेत कार्यरत असतानाही संजय सोनार यांनी आतापर्यंत ३० वेळा स्वेच्छेने रक्तदान केले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव यांच्याकडून घेण्यात आली असून, त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे.
माऊली फाउंडेशन, भडगाव यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरातही सोनार यांचा सक्रिय सहभाग असतो. रक्तदानाबाबत तरुणांमध्ये जनजागृती व्हावी आणि अधिकाधिक नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी ते सातत्याने आवाहन करीत आहेत.
वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याचे आवाहन
“प्रत्येकाने किमान वर्षातून एकदा रक्तदान करण्याचा संकल्प करावा. स्वतःच्या वाढदिवशी, पत्नीच्या किंवा मुलांच्या वाढदिवशी रक्तदान करून हा दिवस सामाजिक बांधिलकीने साजरा करता येईल. आपण केलेले रक्तदान भविष्यात आपल्या परिचित किंवा नातेवाईकाच्या देखील उपयोगी पडू शकते,” असे आवाहन संजय सोनार यांनी केले.
