खेरनगर मनपा माध्यमिक इंग्रजी शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात
विद्यार्थ्यांनी दिला सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि ‘जय जवान, जय किसान’चा संदेश; शाळेत स्वच्छता अभियान
मुंबई/बांद्रा (पूर्व) : खेरनगर येथील मुंबई महानगरपालिका माध्यमिक इंग्रजी शाळेत २ ऑक्टोबरनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक संजय राठोड यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेच्या विचारांवर आधारित मनोगते व्यक्त केली. ‘सत्याचा नेहमी विजय होतो’ आणि ‘जय जवान, जय किसान’ अशा घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला.
शिक्षकांनी केले मार्गदर्शन
कार्यक्रमाला मुख्याध्यापक संजय राठोड यांच्यासह वरिष्ठ शिक्षिका अर्चना सिंह आणि निकिता गावित उपस्थित होत्या. तसेच शिक्षक विजयकुमार पाटील आणि लक्ष्मण खेत्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विजयकुमार पाटील यांनी गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांसोबतच लाल बहादूर शास्त्री यांच्या साधेपणा आणि परिश्रमाच्या मूल्यांवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी या दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा आपल्या जीवनात अंगीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
लक्ष्मण खेत्री यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेची पार्श्वभूमी आणि देशासाठीच्या त्यांच्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियान
जयंतीनिमित्त शाळेत स्वच्छता अभियानही राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी वर्गखोल्या आणि शाळेचा परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला. स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले, तर शिक्षिका नयना मोटघरे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
