हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी लक्षणे दिसताच वैद्यकीय मदत घ्या
प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राजेश मानवतकर यांचा सल्ला; ‘आरोग्य साक्षरता आणि केअरटेकर फ्रेंड्स’ संकल्पना रुजविण्याचे आवाहन
भुसावळ, प्रतिनिधी – संघरत्न सपकाळे : वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या आहारपद्धतीमुळे हृदयरोगासह विविध गंभीर आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे आजारांची लक्षणे आणि प्राथमिक उपाययोजनांबाबत प्रत्येकाने जागरूक असणे गरजेचे आहे. हृदयरोगाची लक्षणे दिसताच वेळ न दवडता तातडीने योग्य वैद्यकीय मदत घ्यावी, असा सल्ला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राजेश मानवतकर यांनी दिला.
कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील मराठी विभागाच्या वतीने श्रद्धेय हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त ‘चला आरोग्यावर बोलू काही’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘हृदयरोग व इतर गंभीर आजार कसे टाळता येतील?’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. मानवतकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कोल्हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन हेमलताताई इंगळे, सचिव भास्कर पिंपळे तसेच संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य उपस्थित होते.

व्यायाम, आरोग्य तपासणी आणि संतुलित आहार महत्त्वाचा
डॉ. मानवतकर यांनी हृदयरोगासह विविध शारीरिक आजारांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचारपद्धती याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, नियमित योग्य व्यायाम, वेळोवेळी आरोग्य तपासणी आणि आरोग्यदायी आहार या तीन बाबींना जीवनात महत्त्व दिल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घ्यावी. विविध आजारांची प्राथमिक लक्षणे प्रत्येक कुटुंबातील सदस्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे योग्य वेळी वैद्यकीय उपचार घेण्याची संधी मिळू शकते. यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एकमेकांचा ‘वैद्यकीय केअरटेकर’ बनून आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन
कोणताही आजार शरीरात निर्माण झाल्यानंतर विविध लक्षणांच्या माध्यमातून त्याची सूचना देत असतो. मात्र, या लक्षणांची माहिती नसल्यामुळे अनेकदा नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि परिणामी आजाराची तीव्रता वाढू शकते. हे टाळण्यासाठी प्रत्येक कुटुंबात आरोग्यविषयक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे डॉ. मानवतकर यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, पक्षाघात आणि मूत्राशयाशी संबंधित आजार यांची प्राथमिक लक्षणे तसेच उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत माहिती दिली.
आपत्कालीन परिस्थितीत तातडीच्या उपायांची माहिती
एखाद्या व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा त्रास झाल्यास त्याच्या जवळच्या व्यक्तींनी तातडीने कोणती पावले उचलावीत, याबाबतही डॉ. मानवतकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
‘आरोग्य साक्षरता’ आणि ‘आरोग्य केअरटेकर फ्रेंड्स’ या दोन्ही संकल्पना समाजात मोठ्या प्रमाणावर रुजणे गरजेचे असून, प्रत्येकाने आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विभागातील सहकारी प्रा. डॉ. दिनेश पाटील यांनी केले. कार्यक्रमास संस्थेच्या कार्यकारी मंडळातील संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
