धरणगावात दशलक्षण पर्वाची भक्तीमय सांगता; २४ तीर्थंकर महापूजा व जलयात्रा महोत्सव थाटात
ढोल-ताशांच्या गजरात रथोत्सव, महिलांचा गरबा अन् लेझीम पथकाचे आकर्षण; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक स्पर्धांच्या विजेत्यांचा गौरव
धरणगाव, प्रतिनिधी : येथील दिगंबर जैन समाजाच्या वतीने दशलक्षण पर्वाच्या सांगतेनिमित्त आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय धार्मिक सोहळा दि. २ व ३ ऑक्टोबर रोजी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात थाटात पार पडला. या सोहळ्यात २४ तीर्थंकरांची महापूजा, जलयात्रा महोत्सव, रथोत्सव, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दहा दिवस चाललेल्या दशलक्षण पर्वात मंदिरात नित्य अभिषेक, पूजन, पाठशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध व्रत-उपवास आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पाठशाळेचे सुंदर आयोजन सौ. सुलभा लाड यांनी केले.
२४ तीर्थंकरांची भव्य महापूजा
दि. २ ऑक्टोबर रोजी २४ तीर्थंकरांची भव्य महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. धर्मानुरागी श्रीमती कल्पना अनिल डहाळे, स्वप्नील डहाळे व डॉ. श्वेता डहाळे, पुणे परिवाराच्या वतीने या महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी धार्मिक विधींमध्ये सहभागी होत तीर्थंकरांचे दर्शन घेतले.
ढोल-ताशांच्या गजरात जलयात्रा व रथोत्सव
दि. ३ ऑक्टोबर रोजी भव्य जलयात्रा महोत्सव आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. जलयात्रा व रथोत्सव मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले. युवकांनी लेझीम पथकासह नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तर भगवान महावीर चौकात महिलांनी उत्स्फूर्तपणे गरबा नृत्य सादर केले.
रथोत्सवात मालमनोहरची बोली घेणारे चि. अयांश प्रिंतेश जैन यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. या दिवशीचा महाप्रसाद धर्मानुरागी अजय महाजन, प्रणिता महाजन, शलाका, श्रद्धा व पुष्कर महाजन, जळगाव यांच्या वतीने देण्यात आला.
विविध शहरांतील भाविकांची उपस्थिती
या धार्मिक सोहळ्यासाठी बेंगळुरू, मुंबई, पुणे, नागपूर, वर्धा, भडगाव, पारोळा, जळगाव, धुळे, बेटावद आणि एरंडोल येथून असंख्य भाविक धरणगावात दाखल झाले होते. भक्तिमय वातावरणात भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.
यावेळी सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले.
यात्री निवासासाठी देणगीदारांचा सत्कार
यात्री निवासासाठी धर्मानुरागी पियूष जैन, श्रद्धा जैन आणि श्रीमती रंजना महाजन यांनी दोन खोल्यांसाठी देणगी जाहीर केली. त्यांच्या या योगदानाबद्दल श्री. दीपकजी लाड, लिझा जैन आणि सौ. प्राजक्ता लाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदिराचे अध्यक्ष राहुल जैन यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रतीक जैन यांनी केले. संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, जैन उत्सव मंडळ, राजुलमती महिला मंडळ तसेच तरुण कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
