पाचोऱ्यात उद्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र स्तरीय अधिवेशन!
मान्यवरांच्या उपस्थितीत विविध पुरस्कारांचे वितरण; विद्यार्थ्यांना शालेय किट, पत्रकारांना विमा पॉलिसी व टी-शर्टचे वाटप
पाचोरा, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी पाचोरा येथे उत्तर महाराष्ट्र स्तरीय भव्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असून, गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय किट आणि पत्रकार बांधवांना विमा पॉलिसी व टी-शर्टचे वाटप करण्यात येणार आहे. खान्देशी कलाकारांची उपस्थितीही या कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार आहे.
पत्रकार संघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार
या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी, संस्थापक अध्यक्ष तथा संघटक संजयजी भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव वारोटे आणि राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन, वस्त्रोद्योगमंत्री संजयजी सावकारे, माजी मंत्री सतीश अण्णा पाटील, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार अमोल चिमणराव पाटील, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, भाजप युवा नेते अमोलभाऊ शिंदे, भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भडगावचे गटनेते तथा नगरसेवक लकीचंद पाटील आणि पाचोरा नगरपरिषदेचे गटनेते तथा नगरसेवक सुमित पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पुरस्कार वितरणासह सामाजिक उपक्रम
पत्रकार संघाच्या या अधिवेशनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे किट वितरित करण्यात येणार आहे. पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पत्रकार बांधवांना विमा पॉलिसीचे वितरण तसेच टी-शर्ट वाटप करण्यात येणार आहे. खान्देशी कलाकारांच्या उपस्थितीमुळे अधिवेशनाला सांस्कृतिक रंगही लाभणार आहे.
पत्रकार बांधवांना उपस्थितीचे आवाहन
या उत्तर महाराष्ट्र स्तरीय अधिवेशनाला जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, उपाध्यक्ष राकेश सुतार, पाचोरा तालुकाध्यक्ष गौतम सोनवणे आणि भडगाव तालुकाध्यक्ष रतिलाल पाटील यांनी केले आहे.
