मतदारांनी घाबरू नये; SIR अंतर्गत कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही!
नांदगाव तहसीलदार सुनील सौंदाणे यांचे आश्वासन; ११ व १२ ऑक्टोबरला प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिर
प्रज्ञानंद जाधव | दै. जनसम्राट टाईम्स
नांदगाव, प्रतिनिधी | ९ ऑक्टोबर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ११३ नांदगाव विधानसभा मतदारसंघात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-२०२६ सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान मतदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही. नोटीस मिळाली म्हणजे मतदार यादीतून नाव वगळले गेले आहे, असा गैरसमज करून घेऊ नये. कोणताही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासन घेत आहे, असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा नांदगावचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी केले आहे.
तहसीलदार कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, SIR प्रक्रियेअंतर्गत बूथस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देऊन मतदारांना नोटिसा देत आहेत. तसेच आवश्यक कागदपत्रे संकलित करण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेत मतदारांनी BLO यांना सहकार्य करावे आणि आवश्यकतेनुसार मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी दाखवावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत?
मतदारांनी पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालीलपैकी उपलब्ध कागदपत्रे तयार ठेवावीत:
-
आधार कार्ड
-
जन्माचा दाखला
-
शाळा सोडल्याचा दाखला
-
जात प्रमाणपत्र
-
रहिवासी दाखला
-
पासपोर्ट
-
बँक पासबुक
-
घरपट्टी पावती
-
विहित नमुन्यातील कुटुंबातील व्यक्तींची संबंधित कागदपत्रे
मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, हे भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासावे. ज्यांना नोटीस मिळाली आहे, त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित BLO कडे किंवा ऑनलाइन सादर करावा. प्राप्त अर्जांची पडताळणी करून सुनावणीनंतर नियमानुसार अंतिम निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
११ आणि १२ ऑक्टोबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे
मतदार नोंदणीसाठी दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवार, ११ ऑक्टोबर आणि रविवार, १२ ऑक्टोबर रोजी नांदगाव तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
या शिबिरांमध्ये BLO उपस्थित राहून मतदारांकडून विविध प्रकारचे अर्ज स्वीकारतील.
-
फॉर्म क्रमांक ६ : नवीन मतदार नोंदणी
-
फॉर्म क्रमांक ७ : मतदार यादीतून नाव वगळण्यासंबंधी अर्ज
-
फॉर्म क्रमांक ८ : मतदार यादीतील तपशील दुरुस्ती व नियमानुसार बदलांसाठी अर्ज
१८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा
विशेषतः १ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या आणि अद्याप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदविण्यासाठी मतदार यादीत नाव असणे महत्त्वाचे असल्याने पात्र नागरिकांनी आवश्यक अर्ज व कागदपत्रांसह नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा ११३ नांदगाव विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी सीमा अहिरे आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी तालुक्यातील पात्र नागरिकांनी विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
