वाक शिवारात महसूल प्रशासनाचा धडक छापा; ७ डंपर, २ जेसीबी आणि ३ ट्रॅक्टर जप्त!
तहसीलदार शितल सोलाट यांच्या नेतृत्वाखाली सकाळी आठ वाजता कारवाई; अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात प्रशासनाचा कडक पवित्रा
भडगाव, प्रतिनिधी – गणेश रावळ : तालुक्यातील मौजे वाक शिवारात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात भडगाव महसूल प्रशासनाने शुक्रवारी, दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी धडक कारवाई केली. तहसीलदार शितल सोलाट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सकाळी आठ वाजता छापा टाकून एकूण १२ वाहने ताब्यात घेतली. यामध्ये सात डंपर, दोन जेसीबी आणि तीन ट्रॅक्टरचा समावेश आहे. सर्व वाहने भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे छापा
वाक शिवारात विनापरवाना वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर पथकाने सकाळीच कारवाई केली. या मोहिमेत कथित अवैध वाळू उपसा व वाहतुकीशी संबंधित असल्याच्या संशयावरून १२ वाहने ताब्यात घेण्यात आली.
जप्त केलेली वाहने पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. संबंधित वाहनमालक आणि चालकांविरुद्ध नियमानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पथकाची कारवाई
तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मंडळ अधिकारी कुणाल कोळी (भडगाव), महसूल सहाय्यक पंकज भागवत, भूषण मराठे, महादू कोळी, हर्षल भदाणे, ग्राम महसूल अधिकारी अनिता सुतार, गौरव पगारे, गितेश महाजन, विवेक महाजन, प्रसाद दुसुस्कर, योगेश पाटील तसेच महसूल सेवक विशाल सूर्यवंशी, अमोल पाटील आणि किरण मोरे सहभागी झाले होते.
अवैध उत्खनन करणाऱ्यांवर प्रशासनाची नजर
गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने कडक पवित्रा घेतला आहे. अशा प्रकारांवर यापुढेही लक्ष ठेवून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे वाळू उपसा आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता महसूल प्रशासनाची नजर राहणार आहे.
