निंभोरा पोलिसांची कारवाई; ५.४२ लाखांचा गुटखा-पानमसाला जप्त!
वडगाव फाट्याजवळ पहाटे छापा; दोघांना अटक, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
निंभोरा, प्रतिनिधी – अक्षय वाघ : रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडगाव फाट्याजवळ पोलिसांनी कारवाई करत सुगंधित पानमसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा एकूण ५ लाख ४२ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास वडगाव फाट्याजवळ, ता. रावेर, जि. जळगाव येथे घडली. याप्रकरणी जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी योगराज किशोर सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे.
तिघांविरुद्ध गुन्हा; दोघे अटकेत
या प्रकरणात आझिम तैय्यब सय्यद (वय २३), शेख मुबश्शीर कासिम (वय २३) आणि मध्य प्रदेशातील नितू शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी क्रमांक एक आणि दोन यांना पोलिसांनी अटक केली आहे.
निंभोरा पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक मीना देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ४२ हजार ५२० रुपये असल्याची नोंद आहे.
विविध कंपन्यांचा पानमसाला आणि तंबाखू जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत राजनिगंधा सुगंधित पानमसाला, राजनिगंधा सुगंधित पानमसाला विल्सेल, प्रीमियम शॉट लवंगरी च्युइंग तंबाखू, डायरेक्टर स्पेशल पानमसाला गुटखा, पान पराग पानमसाला, आरएमडी गुटखा आणि एक्सपी २० च्युइंग तंबाखू अशा विविध प्रकारच्या पदार्थांचा समावेश आहे.
पुढील तपास सुरू
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मीना देशमुख आणि निंभोरा पोलिस पथक करीत आहे.
