महात्मा फुले हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा!
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनपटावरील डिजिटल व्हिडिओंचे विद्यार्थ्यांनी घेतले दर्शन; पुस्तक वाचनातून ज्ञानवृद्धीचा संदेश
“ग्रंथ हेच आपले गुरू” — गोपाल महाजन
“डॉ. कलाम यांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी” — पी. डी. पाटील
धरणगाव, प्रतिनिधी :
येथील सुवर्णमहोत्सवी महात्मा फुले हायस्कूलमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन करून वाचनाचा आनंद घेतला. तसेच डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावरील डिजिटल व्हिडिओंच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. पवार होते. शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका एम. के. कापडणे आणि ग्रंथपाल गोपाल महाजन यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक पी. डी. पाटील यांनी केले.
वाचनामुळे विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो!
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपशिक्षक पी. डी. पाटील यांनी पुस्तक वाचनाचे महत्त्व विशद केले. “पुस्तक वाचल्याने मस्तक सशक्त होते आणि सशक्त झालेले मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही,” असे सांगत त्यांनी वाचनामुळे ज्ञान, विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढत असल्याचे प्रतिपादन केले.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या संघर्षातून, जिद्दीतून आणि कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन जीवनात मोठे ध्येय निश्चित करावे, असे आवाहनही पी. डी. पाटील यांनी केले.
‘ग्रंथ हेच आपले गुरू’
शाळेचे ग्रंथपाल गोपाल महाजन यांनी ‘ग्रंथ हेच आपले गुरू’ या विचारातून पुस्तकांचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. खरा इतिहास जाणून घेण्यासाठी, ज्ञानात भर घालण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी नियमित वाचन आवश्यक आहे. ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना दररोज वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले.
डिजिटल माध्यमातून कलाम यांच्या कार्याची ओळख
वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेच्या संगणक कक्षात डॉ. कलाम यांच्या जीवनकार्यावरील विविध डिजिटल व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. त्यांच्या वैज्ञानिक योगदानाची, संघर्षमय प्रवासाची आणि देशाच्या विकासातील भूमिकेची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन करून वाचनसंस्कृती जोपासण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. पाटील यांनी केले, तर एस. एन. कोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
