“क्या हुआ तेरा वादा?” मोदी-फडणवीसांना धनगर समाजाचा सवाल; भाजपाने फसवणूक केल्याचा दीपक बोराडेंचा आरोप
एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याचा निर्धार; धुळ्यात धनगर समाजाचा भव्य मोर्चा, क्यूमाईन क्लब येथे सभेत रूपांतर
धुळे | प्रतिनिधी
“क्या हुआ तेरा वादा?” असा सवाल उपस्थित करत धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या आश्वासनाची आठवण धनगर आरक्षणाचे नेते दीपक बोराडे यांनी भाजप सरकारला करून दिली. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक वर्षे उलटूनही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही, असा आरोप करत भाजपने धनगर समाजाची फसवणूक केल्याची टीका बोराडे यांनी केली. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळवून घेणारच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धुळे शहरात दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाची सांगता क्यूमाईन क्लब येथे सभेने झाली. यावेळी बोराडे यांनी उपस्थितांना संबोधित करत आरक्षणाच्या मागणीसाठी संघटितपणे लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
आश्वासनाची आठवण करून देत सरकारला सवाल
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना बोराडे यांनी २०१४ मधील आश्वासनाचा संदर्भ दिला. “शेकडो मंत्रिमंडळ बैठका झाल्या, अनेक वर्षे उलटली; तरी धनगर समाजाला आरक्षण का मिळाले नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आरक्षणाच्या मागणीबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या भूमिकेवर टीका करत समाजाच्या नाराजीला वाचा फोडली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात
धुळे शहरातील आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मोर्चा आग्रा रोड, कराचीवाला खुंट आणि जुनी महानगरपालिका मार्गे क्यूमाईन क्लब येथे पोहोचला. येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
सभेत दीपक बोराडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर आपली भूमिका मांडली. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाजाने एकजुटीने संघर्ष सुरू ठेवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत
धुळे येथे काढण्यात आलेल्या मोर्चाच्या माध्यमातून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी पुढे करत बोराडे यांनी सरकारच्या आश्वासनांबाबत प्रश्न उपस्थित केले. आता या मागणीवर सरकार कोणती भूमिका घेते, याकडे धनगर समाजाचे लक्ष लागले आहे.
