नशिराबादमध्ये तलवार घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
ताजनगर परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप; ३३ इंची तलवार जप्त, शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल
नशिराबाद, जि. जळगाव | प्रतिनिधी
नशिराबाद शहरातील ताजनगर परिसरात उघडी तलवार हातात घेऊन फिरत दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरून नशिराबाद पोलिसांनी एका तरुणाला तलवारीसह ताब्यात घेतले आहे. शेख अल्ताफ शेख रऊफ (वय २८, रा. ख्वाजा गरीब नगर, नशिराबाद, ता. जि. जळगाव) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ३३ इंच लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता एम. नारखेडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ताजनगर परिसरात एक व्यक्ती उघडी तलवार हातात घेऊन फिरत आहे. या माहितीच्या आधारे नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत संबंधित परिसरात सापळा रचला.
दरम्यान, माहितीतील वर्णनाशी जुळणारा एक तरुण हातात उघडी तलवार घेऊन फिरताना पोलिसांना दिसला. पथकाने तत्काळ कारवाई करत त्याला जागीच ताब्यात घेतले. पंचांसमक्ष केलेल्या तपासणीत त्याच्याकडे तलवार आढळून आली.
पोलिसांनी जप्त केलेली तलवार जुनी वापरती असून, ती लोखंडी धातूची व मूठ असलेली आहे. तिची लांबी सुमारे ३३ इंच असून, अंदाजे किंमत १ हजार १०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तलवार पंचांसमक्ष जप्त करून संबंधित तरुणाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता एम. नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेश मेंढे, पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील, प्रशांत विरणारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण लोहार, प्रकाश कोळी, भरत बाविस्कर, समीर सैयद, पंकज सोनवणे आणि सागर बिडे यांच्या पथकाने केली.
अवैध शस्त्रे बाळगून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
