बिग बॉस गाजविल्यानंतर सचिन कुमावत यांचे नांदगावात जल्लोषात स्वागत!
जनकल्याण मराठी पत्रकार संघाकडून खान्देशपुत्र सचिन कुमावत आणि निर्माता-दिग्दर्शक संजय सोनवणे यांचा जंगी सत्कार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
✍️ दीपक अंभोरे । नांदगाव प्रतिनीधी ।
नांदगाव (प्रतिनिधी) : बिग बॉस मराठी सीझन ६मुळे चर्चेत आलेले खान्देशी अभिनेता सचिन कुमावत आणि प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक संजय सोनवणे यांचे नांदगाव नगरीत उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अशा जल्लोषपूर्ण वातावरणात दोन्ही कलावंतांचे आगमन झाले. यानिमित्ताने जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
खान्देशच्या मातीतून पुढे आलेल्या कलावंतांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण केल्याचा अभिमान नांदगावकरांनी यावेळी व्यक्त केला. सचिन कुमावत यांनी बिग बॉसच्या घरात खान्देशी बोलीभाषा, संस्कृती आणि मातीशी असलेली नाळ जपल्यामुळे त्यांच्याबद्दल प्रेक्षकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तर निर्माता-दिग्दर्शक संजय सोनवणे यांनी खान्देशी कथांना चित्रपटाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देत स्थानिक कलाविश्वाला चालना दिली आहे.
जनकल्याण मराठी पत्रकार संघाकडून सन्मान
या स्वागत सोहळ्याचे आयोजन जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते. संघाचे तालुकाध्यक्ष प्रज्ञानंद (बापू) जाधव यांच्या हस्ते सचिन कुमावत आणि संजय सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला. खान्देशच्या कलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून परिसराचे नाव उज्ज्वल करावे आणि नव्या पिढीतील कलाकारांना प्रेरणा मिळावी, या भावनेतून हा सत्कार आयोजित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचे बंधू किरण कांदे, सभापती यज्ञेश कलंत्री, रमेश (मामा) काकळीज, माजी सभापती विलास आहेर, पत्रकार विशाल पवार यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“नांदगाव हे माझे दुसरे घर!”
सत्काराला उत्तर देताना अभिनेता सचिन कुमावत यांनी नांदगावकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “नांदगाव हे माझे दुसरे घर आहे. येथील नागरिकांनी दिलेले प्रेम मी कधीही विसरणार नाही. लवकरच खान्देशच्या मातीतील एक भव्य प्रोजेक्ट घेऊन मी पुन्हा येईन,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
निर्माता-दिग्दर्शक संजय सोनवणे यांनीही नांदगावच्या कलाप्रेमी नागरिकांचे आभार मानले. स्थानिक कलाकार, कथा आणि संस्कृती यांना मोठे व्यासपीठ मिळावे, यासाठी प्रयत्नशील राहण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
खान्देशच्या कलावंतांमुळे सांस्कृतिक क्षेत्राला बळ
या भेटीमुळे नांदगावच्या सांस्कृतिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक मातीतील कलाकार मनोरंजन क्षेत्रात यश मिळवून आपल्या भागाची ओळख राज्यभर पोहोचवत असल्याने युवा पिढीला प्रेरणा मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. सचिन कुमावत यांच्या आगामी प्रकल्पाबाबतही उपस्थितांमध्ये उत्सुकता दिसून आली.
