विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासत व्यासंग वाढवावा : डॉ. प्रसाद चौधरी
शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा; पुस्तक वाचनासोबत वैचारिक चर्चेवर भर
जळगाव | प्रतिनिधी
भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमातील पुस्तकांसोबतच अवांतर वाचनासाठी विविध पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. संस्थेचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
‘मोबाईलसोबत हातात पुस्तकही असावे’
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रसाद चौधरी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता संदर्भग्रंथ, चरित्रे, आत्मचरित्रे, वैचारिक साहित्य तसेच विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयांवरील पुस्तकांचे नियमित वाचन करावे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे ग्रंथालय ही त्या संस्थेची महत्त्वाची ज्ञानसंपदा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील उपलब्ध साहित्याचा उपयोग करून आपले ज्ञान अधिक व्यापक करावे.
“विद्यार्थ्यांनी मोबाईलसोबतच हातात पुस्तकही ठेवावे,” असे आवाहन करत डॉ. चौधरी यांनी वाचनामुळे व्यक्तीच्या विचारांना व्यापकता मिळते, सामाजिक जाणीवा विकसित होतात आणि संवेदनशील व सजग नागरिक घडण्यास मदत होते, असे स्पष्ट केले.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे कार्य, विचार आणि जीवनप्रवास वाचनातून समजून घेऊन त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा पुढे न्यावा, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचनाची सवय दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन त्यांनी केले.
वाचनानंतर साधक-बाधक वैचारिक चर्चा
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वाचन प्रेरणा दिन केवळ औपचारिक कार्यक्रमापुरता मर्यादित न ठेवता वाचनातून मिळालेल्या ज्ञानावर आधारित वैचारिक चर्चेचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. प्रसाद चौधरी यांच्या वाचनावर आधारित साधक-बाधक चर्चेतून विचारांची देवाणघेवाण घडवून आणण्यात आली. अशा चर्चेमुळे विद्यार्थ्यांना विविध दृष्टिकोन समजून घेण्याची आणि चिकित्सक विचार करण्याची संधी मिळाली.
ग्रंथालयाचा ज्ञानवृद्धीसाठी उपयोग करण्याचे आवाहन
येत्या काळात विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाकडे नियमितपणे वळून पुस्तकांशी मैत्री करावी, असे मत स्थापत्य विभागप्रमुख डॉ. पराग पाटील यांनी व्यक्त केले. तसेच ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात भर घालावी, असे आवाहन ग्रंथालयीन अधिकारी प्रा. सी. पी. भोळे यांनी केले.
यावेळी कार्यालयीन प्रमुख श्री. जाधव यांच्यासह ग्रंथालयातील अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे, ज्ञानाचा विस्तार करणे आणि वैचारिक प्रगल्भता वाढविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
