धुळ्यात अघोरी कृत्य! विषबाधेमुळे १६ कुत्र्यांचा मृत्यू; पश्चिम देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल
वाडीभोकर रोडवरील सुशांत कॉलनी परिसरातील घटना; सीसीटीव्हीत दोन संशयितांच्या हालचाली कैद, पोलिसांकडून तपास सुरू
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरातील वाडीभोकर रोड परिसरात कुत्र्यांना अन्नातून विष दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामध्ये तब्बल १६ कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्राणिमित्रांसह नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी रिशिका उत्तम पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपचार सुरू असतानाच पाळीव कुत्र्याचा मृत्यू
वाडीभोकर रोडवरील सुशांत कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री रिशिका पाटील यांच्या ‘झिंगा’ नावाच्या पाळीव कुत्र्याच्या तोंडातून अचानक लाळ गळू लागली. तसेच तो तडफडू लागल्याने पाटील यांनी तातडीने पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र उपचारादरम्यानच झिंगाचा मृत्यू झाला.
याच परिसरात आणखी चार कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. शनिवारी सायंकाळपर्यंत मृत कुत्र्यांची संख्या ११ वर पोहोचली होती. त्यानंतर हा आकडा वाढून एकूण १६ कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.
शवविच्छेदनातून विषप्रयोगाचा संशय
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर मृत कुत्र्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. कुत्र्यांना अन्नातून विष दिल्याचा प्रकार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे समजते.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास
या घटनेनंतर पश्चिम देवपूर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या फुटेजमध्ये दोन अज्ञात व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित व्यक्तींची ओळख पटवून घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
एका पाठोपाठ १६ कुत्र्यांचा मृत्यू झाल्याने वाडीभोकर रोड परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणातील दोषींना शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची अपेक्षा नागरिक आणि प्राणिमित्रांकडून व्यक्त केली जात आहे.
