दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
सप्तशृंगी मातेला साकडे; नवरात्रोत्सवातील सप्तमीला घेतले देवीचे दर्शन, आरती व पूजन करून शेतकऱ्यांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना
सप्तशृंगगड/जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी)
राज्यासह जळगाव जिल्ह्यावर निर्माण झालेल्या दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, बळीराजाच्या कष्टाला फळ मिळावे आणि सर्वांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदावी, असे साकडे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्तशृंगी मातेला घातले. नवरात्रोत्सवातील सप्तमीच्या पवित्र दिवशी त्यांनी सप्तशृंगगडावर जाऊन देवीचे दर्शन घेत विधिवत पूजन आणि आरती केली.
सप्तमीला दर्शन घेण्याची परंपरा कायम
पालकमंत्री गुलाबराव पाटील दरवर्षी नवरात्रोत्सवातील सप्तमीला सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी येतात. यंदाही त्यांनी ही परंपरा कायम ठेवत देवीसमोर नतमस्तक होऊन मनोभावे प्रार्थना केली. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, पाणीटंचाईच्या समस्येतून जनतेची सुटका व्हावी आणि बळीराजाच्या जीवनात पुन्हा समाधानाचे दिवस यावेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना
शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे शेतकरी व ग्रामीण जनतेसमोर अनेक आव्हाने उभी राहतात. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत, त्यांच्या कष्टाला योग्य फळ मिळावे आणि जिल्ह्यात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना पालकमंत्री पाटील यांनी सप्तशृंगी मातेकडे केली.
यावेळी त्यांच्यासोबत विविध लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
