स्पर्धा परीक्षार्थींसाठी ‘MahaGKNotes’ वेबसाईटचे उद्घाटन
MPSCसह विविध स्पर्धा परीक्षांचे दर्जेदार अभ्यास साहित्य आता अल्प दरात एकाच व्यासपीठावर
जामनेर | प्रतिनिधी
MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या महाजीकेनोट्स (MahaGKNotes) या शैक्षणिक वेबसाईटचे उद्घाटन राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या वेबसाईटवर विविध विषयांच्या नोट्स, वस्तुनिष्ठ प्रश्न, वन-लाइनर्स तसेच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक सोपा, नियोजनबद्ध आणि परिणामकारक व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
‘सर्व स्पर्धा परीक्षांसाठी एकच ठिकाण’
‘MPSC व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी एकच ठिकाण’ या संकल्पनेतून MahaGKNotes हे व्यासपीठ साकारण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे अभ्यास साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि त्यासाठी होणारा खर्च कमी व्हावा, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या वेबसाईटमुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांचे अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होणार असून, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या उद्घाटनप्रसंगी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कडू माळी, स्वीय सहाय्यक दीपक तायडे, आयएमआर कॉलेजचे सचिव दीपक पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य नितीन झाल्टे, प्रदीप माळी, आकाश सोनवणे आणि स्नेहा सोनवणे उपस्थित होते.
तसेच MahaGKNotes वेबसाईटचे संचालक आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जामनेरचे प्राचार्य डॉ. किशोर पाटील व डॉ. तेजश्री पाटील यांचीही उपस्थिती होती.
स्पर्धा परीक्षार्थींना दर्जेदार आणि परवडणारे अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याच्या या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी संधी मिळणार आहे.
