स्व. अजितदादा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे दिलदार नेतृत्व! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
पाडळसे धरणाला अजितदादांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; जळगाव जिल्हा बँकेत पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, मान्यवरांकडून आठवणींना उजाळा
जळगाव, दि. २५ (प्रतिनिधी) : “दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्पष्टवक्ते, निर्णयक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. स्वभावाने कणखर असले तरी सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत त्यांचे मन नेहमीच हळवे होते. पक्ष कोणताही असो, सामान्य माणसाचा प्रश्न समोर आला की मदतीचा हात पुढे करण्यात त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. अशा दिलदार आणि लोकाभिमुख नेतृत्वाचे जाणे ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे. त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी पाडळसे धरणाला त्यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील राहू,” अशी भावना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
जळगाव शहरातील रिंग रोडवरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित मुख्य समारंभात पालकमंत्री बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वाच्या आठवणींना उजाळा दिला.

अजितदादांच्या आठवणी सांगताना पालकमंत्री भावुक
अजितदादा पवार यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना गुलाबराव पाटील भावुक झाले. ते म्हणाले की, अजितदादा अर्थमंत्री असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ४७ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. सर्वसामान्यांच्या कामांना न्याय देण्याची त्यांची कार्यपद्धती होती.
काम करताना शिस्त, निर्णय घेताना ठामपणा आणि माणसांशी वागताना आपुलकी, ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये होती. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी केलेली कामे आणि त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील, असेही पालकमंत्र्यांनी नमूद केले. जिल्हा बँकेच्या आवारात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्यांच्या कार्याचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी बँकेच्या संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
सहकार क्षेत्रासाठी अजितदादांचे योगदान प्रेरणादायी – बाबासाहेब पाटील
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, अजितदादा पवार यांना सहकार, शेती, दुग्धव्यवसाय आणि उद्योग क्षेत्राची सखोल जाण होती. अडचणीत असलेल्या सहकारी संस्थांना मदत करून त्यांनी सहकार चळवळीला बळ दिले. सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या सुमारे ४,५०० कोटी रुपयांच्या ठेवी आणि २३२ शाखांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाचे त्यांनी कौतुक केले. अजितदादांचा पुतळा बँकेचे संचालक, कर्मचारी आणि भावी पिढीला सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
कठोर निर्णय, पण कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे नेतृत्व
वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी अजितदादांच्या शिस्तप्रिय आणि निर्णयक्षम नेतृत्वाचा उल्लेख केला. वित्त व नियोजन विभागाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आर्थिक शिस्तीला महत्त्व दिले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या विकासासाठी निर्णय घेण्याची त्यांची भूमिका होती.
कार्यकर्त्यांना शिस्त लावत असतानाच त्यांच्या योग्य कामांसाठी ते मदतीला उभे राहत असत. जिल्ह्यातील अनेक विकासकामांना त्यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली. त्यांच्या कार्याची आठवण हा पुतळा कायम करून देत राहील, असे संजय सावकारे यांनी सांगितले.
मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना
यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिल पाटील, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन आणि माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन यांनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी बँकेच्या कामकाजाचा आढावा घेत अजितदादांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाविषयीचे अनुभव सांगितले. बँकेचे उपाध्यक्ष तथा आमदार अमोल पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचेही अनावरण
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा बँकेच्या मुख्य इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तैलचित्राचे अनावरण सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला.
या सोहळ्यास सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, महापौर दीपमाला काळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील, माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष आमदार अमोल पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, माजी महापौर विष्णू भंगाळे, जयश्री महाजन, रवींद्र भैय्या पाटील, रोहित निकम, प्रतिभा शिंदे यांच्यासह बँकेचे संचालक, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक हर्षल पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संजय पवार यांनी पुतळा अनावरणाविषयी माहिती दिली, तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आभार मानले. जिल्हा बँकेचे सभासद, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते.
