धक्कादायक! साक्री तालुक्यात दुहेरी हत्याकांड; पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलाची हत्या
आष्टाणे गावात खळबळ; कौटुंबिक वादातून दगडाने ठेचल्याची प्राथमिक माहिती, पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त
साक्री | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आष्टाणे गावात पत्नी आणि तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाईजाबाई नागेश ठाकरे (वय २८) आणि रोहित नागेश ठाकरे (वय ३) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून पतीने दगडाने ठेचून दोघांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर संबंधित पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती असून, त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आष्टाणे गावात घटनेने खळबळ
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आष्टाणे गावात ही घटना घडली. पत्नी आणि चिमुकल्या मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेमागे कौटुंबिक वाद कारणीभूत होता की अन्य काही कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
साक्री पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी तातडीने आष्टाणे गावात धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली. घटनास्थळाची पाहणी करून घटनेशी संबंधित माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
या दुहेरी हत्याकांडामुळे साक्री तालुक्यात खळबळ उडाली असून, रात्री उशिरापर्यंत आष्टाणे येथील नागरिकांनी साक्री पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली होती. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या घटनेमागील नेमके कारण आणि इतर तपशील पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.
