बालाजींच्या विश्रांतीने रथोत्सवाची सांगता; गरुड परिवारातील १४७ वर्षांची परंपरा कायम!
पांझरा नदीत मूर्तींना स्नान, गरुड बागेत महाआरती व विधिवत पूजा; सायंकाळपर्यंत भगवान बालाजींचा विश्राम
धुळे | प्रतिनिधी
भगवान बालाजींच्या चार दिवसांच्या रथोत्सवाची गरुड परिवाराकडे विश्रांतीने भक्तिमय वातावरणात सांगता झाली. धुळे शहरात भगवान बालाजींच्या विश्रांतीची गरुड परिवारातील तब्बल १४७ वर्षांची परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे. सकाळी पालखी मिरवणूक काढून भगवान बालाजींना गरुड बागेत आणण्यात आले. तेथे बकुळीच्या झाडाखाली भगवान बालाजी सायंकाळपर्यंत विश्रांती घेत असल्याची परंपरा पार पाडण्यात आली.
पांझरा नदीत मूर्तींना स्नान; पालखी मिरवणुकीने गरुड बागेत आगमन
धुळे शहरातील गल्ली क्रमांक चारमधील भगवान बालाजी मंदिरातून सकाळी मूर्तींची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पांझरा नदीवर भगवान बालाजींच्या मूर्तींना स्नान घालण्यात आले. नदीकिनाऱ्यावरून पालखी मिरवणूक गरुड बागेत नेण्यात आली. तेथे महाआरती करून भगवान बालाजींना अन्नपदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. विधिवत पूजा-अर्चा करून संपूर्ण गरुड परिवाराने मनोभावे सेवा केली.
बकुळीच्या झाडाखाली विश्रांतीची परंपरा
गरुड बागेतील बकुळीच्या झाडाखाली भगवान बालाजी सायंकाळपर्यंत विश्रांती घेत असल्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. यंदाही ही परंपरा भक्तिभावाने पार पाडण्यात आली. सायंकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गरुड परिवारातील या ऐतिहासिक परंपरेला १४७ वर्षे पूर्ण झाली असून, पिढ्यान्पिढ्या जपली जाणारी ही धार्मिक परंपरा धुळे शहराच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक ठरत आहे. भगवान बालाजींच्या विश्रांतीनंतर चार दिवसांच्या रथोत्सवाची सांगता झाल्याची माहिती प्रणव गरुड यांनी दिली.
गरुड परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती
या धार्मिक सोहळ्याला भगवान बालाजी मंदिराचे पुजारी लक्ष्मीकांत काकडा, प्रणव गरुड, देवदत्त गरुड, रूपक गरुड, पुष्कर गरुड, सिद्धनाथ गरुड, रुद्र गरुड, दामिनी गरुड, सायली बापट, सुरभी गरुड, शिवानी गरुड, चिन्मयी गरुड, आश्लेषा गरुड, रंजना खैरनार, अरहात गरुड, हिना चितळे यांच्यासह गरुड परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
