मालमत्ता करात डिसेंबरअखेरपर्यंत ३ टक्के सूट; जानेवारीपासून थकीत करावर दंड!
पिंप्राळा येथील शिबिरात अवघ्या चार तासांत २ लाख ८ हजारांची करवसुली; सवलतीचा लाभ घेण्याचे महापालिकेचे आवाहन
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेतर्फे मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पिंप्राळा परिसरातील निमखेडी शाळेत विशेष करवसुली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अवघ्या चार तासांत २ लाख ८ हजार रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला. दरम्यान, नागरिकांना डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत मालमत्ता कर भरण्यावर ३ टक्के सूट मिळणार असून, जानेवारी २०२७ पासून थकीत करावर दरमहा २ टक्के दंड आकारला जाणार आहे.
चार तासांत ३० मिळकतधारकांचा प्रतिसाद
महापालिकेच्या महसुलात वाढ व्हावी आणि नागरिकांना मालमत्ता कर भरणे अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने पिंप्राळा परिसरात या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी २ या चार तासांच्या कालावधीत झालेल्या शिबिरात परिसरातील ३० मिळकतधारकांनी सहभाग नोंदवत मालमत्ता कराचा भरणा केला. या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत २ लाख ८ हजार रुपयांचा महसूल जमा झाला.
वेळेत कर भरा, दंड टाळा!
मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत ३ टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे. मात्र, जानेवारी २०२७ पासून थकीत मालमत्ता करावर दरमहा २ टक्के दंड आकारण्यास सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी मुदतीत कर भरावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
नागरिकांनी उपलब्ध सवलतीचा लाभ घेत मालमत्ता कराचा भरणा वेळेत करावा, जेणेकरून अतिरिक्त दंडाचा आर्थिक भार टाळता येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
