सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त छावा मराठा युवा महासंघातर्फे अभिवादन!
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बॅनर, मिरवणूक आणि रॅली टाळण्याचा निर्णय; कार्यक्रमांवरील खर्च समाजोपयोगी उपक्रमांसाठी वापरणार
जळगाव | प्रतिनिधी
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने जळगाव येथील देवा भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सरदार पटेल यांच्या राष्ट्रएकात्मतेच्या कार्याचे स्मरण केले.
या प्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे, महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष विद्या झनके, जिल्हा उपाध्यक्ष निलू इंगळे, ज्योती खरे, महानगर सचिव हितेंद्र टेकावडे, सचिव नंदू बडगुजर, चंद्रशेखर महाले, मनोहर बडगुजर, आनंद महिरे, भीमराव सोनवणे, गुरुनाथ सैंदाणे, सागर साळुंखे, योगेश चौधरी आणि सुधाकर पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दुष्काळग्रस्तांच्या परिस्थितीचे भान; अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे म्हणाले की, यंदाची दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन संघटनेच्या वतीने कोणतेही बॅनर लावण्यात आलेले नाहीत. तसेच शोभायात्रा, मिरवणूक किंवा रॅलीचे आयोजनही करण्यात आलेले नाही. अशा कार्यक्रमांवर होणारा खर्च समाजोपयोगी उपक्रमांसाठी वापरण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे सरदार पटेल
सरदार वल्लभभाई पटेल यांनी ५६० हून अधिक संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून देशाच्या एकतेचा भक्कम पाया रचला. त्यांच्या या ऐतिहासिक योगदानामुळे त्यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी केली जाते. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांनी एकत्रित राहावे आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, हीच सरदार पटेल यांना खरी मानवंदना ठरेल, असे मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
