शेळावे खुर्द येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी!
आदिवासी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती; अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि सामाजिक एकतेचा संदेश पुढे नेण्याचा संकल्प
शेळावे खुर्द : धरती आबा जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती शेळावे खुर्द येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून अभिवादन केले. भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनकार्याचे स्मरण करीत त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रविण भाऊ पारधी यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. सूर्यकांत भाऊ पवार उपस्थित होते, तर मंडळ अधिकारी कोल्हापूर भटू भाऊ दाभाडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नाना भाऊ मोरे, बबिताताई गायकवाड, प्रकाश पारधी, संजय भील, भटू चव्हाण, प्रकाश पाटील, सतीश सर, रोहित पारधी, गुलाब मोरे, आनंदा बिराडे, सुनील भील, पोलीस पाटील डॉ. महेंद्र सांगळे आदी मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा जागर
भगवान बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष, आदिवासी समाजाची एकजूट आणि स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला. त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे स्मरण करून समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येत सामाजिक न्याय, हक्क आणि स्वाभिमानासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व समाज बांधवांचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
