अजितदादांच्या स्मृतींना अमित शाह यांचे अभिवादन!
पुणे जिल्हा परिषदेत अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण; प्रवेशद्वाराला अजितदादांचे नाव, मान्यवरांकडून कार्याचा गौरव
पुणे (प्रतिनिधी) :
लोकनेते तथा दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतींना केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी अभिवादन केले. पुणे जिल्हा परिषदेच्या परिसरात अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि प्रवेशद्वाराचे नामकरण अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनातून अजितदादांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास, जनसेवेचा ध्यास आणि विकासकामांमधील योगदानाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या कार्याचा आणि जनसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा परिचय या प्रदर्शनातून उपस्थितांना झाला.
अजितदादांच्या सहचारिणींनी हा प्रसंग भावनिक असल्याची भावना व्यक्त केली. अजितदादांची अपूर्ण स्वप्ने, त्यांचे विचार आणि विकासाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करताना त्यांचा राजकीय प्रवास युवा नेत्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशी भावना व्यक्त केली.
‘अजितदादा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान!’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गटाच्या) नेते अच्युतराव लांडगे यांनी या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “आज पुणे जिल्हा परिषदेत अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण होत असताना त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. अजितदादा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि राजकारणाचा मानबिंदू होते. सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले, तसेच प्रशासनावर मजबूत पकड असलेले ते नेतृत्व होते.”
अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून, त्यांची उणीव कायम जाणवत राहील, असे सांगत लांडगे यांनी ‘मिस यू दादा!’ या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुणे जिल्हा परिषदेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या अनावरणामुळे अजितदादांच्या कार्याच्या स्मृतींना कायमस्वरूपी अभिवादन करण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला. या कार्यक्रमातून त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा आणि जनसेवेच्या योगदानाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त झाला.
