मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईला वायू प्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट होत असून शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबईकरांना प्रदूषित हवेत श्वास घ्यावा लागत आहे. बुधवारी मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १७९ नोंदविण्यात आला. मंगळवारी हा निर्देशांक १९१ पर्यंत पोहोचला होता.
बुधवारी त्यात काहीशी घट झाली असली, तरी हवेतील प्रदूषणाची पातळी आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक कायम आहे. गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहता प्रदूषणाची तीव्रता स्पष्ट होते. शनिवारी एक्यूआय १७०, रविवारी १७२, सोमवारी १८२, तर मंगळवारी १९१ इतका नोंदविण्यात आला. बुधवारी तो १७९ वर आला. मात्र, प्रदूषणातून मुंबईकरांची अद्याप सुटका झालेली नाही.
बांधकामांची धूळ आणि वाहनांचा धूर ठरतोय प्रदूषणाचे कारण
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली विकासकामे, बांधकाम प्रकल्पांमधून उडणारी धूळ, वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि विविध मानवी उपक्रमांमुळे वातावरणात प्रदूषकांचे प्रमाण वाढत आहे. त्यातच पावसाळ्यानंतर सुरू झालेले थंड हवामान आणि हिवाळ्यातील वातावरणीय बदल यामुळे प्रदूषके जमिनीलगतच्या हवेत अडकून राहत आहेत.
किनारपट्टी तसेच शहरी भागांमध्ये वाऱ्याचा वेग कमी असल्याने धूर आणि धूलिकण हवेतून वेगाने दूर जात नाहीत. परिणामी मुंबईच्या वातावरणात धुरक्याचे प्रमाण वाढत असून हवेची गुणवत्ता खालावत आहे.
किमान तापमान विशीखाली; थंडी वाढण्याची शक्यता
मुंबईत आता थंडीची चाहूल लागली असून किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. सांताक्रूझ वेधशाळेत बुधवारी किमान तापमान १९, तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गुरुवारी किमान तापमान १८ आणि कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांत गारठा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. सध्या मुंबईवर धुक्याचे सावट असून गुरुवारीही अशाच वातावरणाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
प्रदूषणाचे प्रमुख हॉटस्पॉट
मुंबईतील विविध भागांमध्ये प्रदूषणाची पातळी वेगवेगळी नोंदविण्यात आली. त्यात कन्नमवार नगर येथे सर्वाधिक १९५ एक्यूआयची नोंद झाली.
कन्नमवार नगर – १९५
जुहू तारा – १८९
दहिसर – १८८
चारकोप – १८७
बोरीवली आणि चेंबूर – १८६
विलेपार्ले, वाशी आणि चांदिवली – १८५
गोराई – १८४
हिरानंदानी – १८२
वांद्रे पश्चिम – १८१
एकीकडे विकासकामांचा वेग वाढत असताना दुसरीकडे प्रदूषण नियंत्रणाचे आव्हान मुंबईसमोर उभे राहिले आहे. बांधकामांमधील धूळ नियंत्रण, वाहनांचे उत्सर्जन कमी करणे आणि प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.
